बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 20:24 IST2025-11-14T20:15:12+5:302025-11-14T20:24:12+5:30
पुणे वनविभागाचे पथक दाखल झाल्यानंतर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतप्त गावकऱ्यांनी या घटनेनंतर बंद पाळला.

बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
leopard Attack: अहिल्यानगर जिल्ह्यातील खारेकर्जुने येथे वस्तीवरून पाच वर्षीय चिमुकलीला बिबट्याने बुधवारी सायंकाळी उचलून नेले होते. रात्रभर गावकऱ्यांनी तिचा शोध घेतला. अखेर १३ नोव्हेंबर रोजी सकाळी हिंगणगाव रस्त्यालगत शाळेच्या मागील बाजूस या मुलीचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून, गुरुवारी गावात बंद पाळण्यात आला. बिबट्या जेरबंद होत नाही, तोपर्यंत जिल्हा परिषद व माध्यमिक शाळाही बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
खारेकर्जुने येथे बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात शेकोटी करत असताना तुरीच्या शेतातून आलेल्या बिबट्याने पाच वर्षीय रियांका सुनील पवार हिला उचलून नेले होते. रात्रभर या मुलीचा शोध ग्रामस्थांनी घेतला.
अखेर गुरुवारी सकाळी येथील शाळेच्या मागील बाजूस हिंगणगाव रस्त्यालगत मुलीचा मृतदेह सापडला. बिबट्याच्या हल्ल्यात तिच्या हाता-पायावर मोठ्या जखमा झाल्याचे आढळून आले.
या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी खारेकर्जुने येथील ग्रामस्थांनी तातडीने बैठक बोलावली. जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही, तोपर्यंत गाव बंद ठेवण्यात येईल, अस इशारा ग्रामस्थांनी दिला होता. मात्र, पुणे वनविभागाचे पथक गावात दाखल झाल्यानंतर चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे पथक आता बिबट्याचा शोध घेत आहेत.
पुण्याचे पथक खारेकर्जुनेमध्ये, ड्रोनद्वारे घेणार बिबट्याचा शोध
खारेकर्जुने येथील घटनेनंतर बिबट्याचा शोध घेण्यासाठी पुणे येथील चार जणांचे शोधपथक गावात दाखल झाले आहेत. रात्रभर ड्रोनच्या साहाय्याने हे पथक बिबट्याचा शोध घेणार आहेत.
ही शोध मोहीम सुरू असताना गावातील कुठल्याही ग्रामस्थांनी इकडे फिरकू नये, अशा सूचना या पथकाने ग्रामस्थांना दिल्या आहेत.