कोरोना नियमांचे पालन करीत सकाळी भरते कोळवडी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST2021-02-05T06:29:20+5:302021-02-05T06:29:20+5:30
कर्जत : पालकांनी केलेल्या आवाहनाला शिक्षकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील प्राथमिक शाळेतील मुले दररोज सकाळी कोरोनाबाबतच्या ...

कोरोना नियमांचे पालन करीत सकाळी भरते कोळवडी शाळा
कर्जत : पालकांनी केलेल्या आवाहनाला शिक्षकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील प्राथमिक शाळेतील मुले दररोज सकाळी कोरोनाबाबतच्या शासकीय नियमांचे पालन करीत ऑनलाइनबरोबरच ऑफलाइनही अभ्यासही करीत आहेत. यामुळे या गावातील मुलांना अभ्यासाची पुन्हा गोडी लागली आहे.
कर्जत तालुक्यातील कोळवडी येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले. तेव्हापासून शाळा बंद होत्या. फक्त ऑनलाइन अभ्यास सुरू होता. जसजसे लाॅकडाऊन शिथिल होत गेले तसतसे घरात बसून कंटाळलेली मुले बाहेर पडू लागली. ते ऑनलाइन अभ्यासक्रमाला गांभीर्याने घेत नव्हते. लाॅकडाऊन शिथिल झाल्यामुळे शिक्षक शाळेत येऊन त्यांची दैनंदिन कामे करीत ऑनलाइनचे धडे देत होते.
कोळवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्य रस्त्यालगत गावातच आहे. ऑनलाइन अभ्यासात येणाऱ्या अडचणींचा विचार करून पालकांनी दररोज काही वेळ मुलांना शाळेतच बसून अभ्यास करू द्या, अशी कल्पना शिक्षकांपुढे मांडली. त्याला शिक्षकांनीही प्रतिसाद दिला. यामुळे गेल्या महिन्यापासून कोळवडी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी दररोज सकाळी शाळेच्या प्रांगणात बसून अभ्यास करीत आहेत. येथे कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन केले जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली आहे.
---
लोकसहभागातून शाळेचे रूपडे पालटले..
ग्रामस्थांनीही कोरोनाच्या काळात शाळेच्या अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिले. यामध्ये आवारात पेव्हर ब्लॉक बसविले, वृक्षारोपण केले, खेळाचे मैदान तयार केले, पाण्यासाठी बोअर घेतला. ही सर्व कामे लोकसहभागातून केली. यामुळे शाळा व परिसराचे रूपडे पालटले.
----
कोरोना काळापासून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. काही मुलांकडे अत्याधुनिक मोबाइल नव्हते. शिवाय अनेक वेळा रेंजची अडचण निर्माण होते. यामुळे नियमितपणे अभ्यास होत नसे. यामुळे शाळेच्या आवारात बसून अभ्यास करण्याची कल्पना पालकांना सुचली. आम्ही ती राबविल्याचा फायदा होत आहे.
-सुनील क्षीरसागर,
-पालक, कोळवडी
फोटो ३१ कोळवडी शाळा
कोळवडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत अभ्यास करण्यात रमलेले विद्यार्थी.