कीर्तनकाराने ओलांडली क्रौर्याची सीमा, अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; पारनेर तालुक्यातील घटना, आरोपीला पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:22 IST2026-03-16T07:21:55+5:302026-03-16T07:22:25+5:30
यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ (वय ३८), असे संशयित कीर्तनकाराचे नाव आहे.

कीर्तनकाराने ओलांडली क्रौर्याची सीमा, अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; पारनेर तालुक्यातील घटना, आरोपीला पोलिस कोठडी
पारनेर (जि. अहिल्यानगर): तालुक्यातील एका गावातील वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व कीर्तनकाराने मागील ५ वर्षांपासून अल्पवयीन मुलीला धाक दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत पीडित मुलीच्या २२ वर्षीय भावाने पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कीर्तनकाराला अटक करून त्याच्यावर ‘पोस्को’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ (वय ३८), असे संशयित कीर्तनकाराचे नाव आहे. पारनेर पोलिसांनी रविवारी पहाटे ४ वाजता राहत्या घरातून त्याला अटक केली. जिल्हा न्यायालयाने २० मार्चपर्यंत आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग यांनी दिली.
कोणाला सांगितले तर जाळून टाकीन ड -
फिर्यादीत म्हटले की, शालेय शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाच वर्षांपूर्वी कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने विनयभंग केला. ही मुलगी आरोपीच्या घरी आलेली असताना, त्याने अत्याचार केला तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिचे आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. मात्र, भीतीपोटी तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.
१० मार्च रोजी आरोपीने फोन करून मुलीला घरी बोलावले. तिने नकार दिला असता, आरोपीने तिला धमकावले. मुलगी घरी आल्यानंतर ‘तू लवकर का आली नाहीस’ असे म्हणून मारहाण केली. लोखंडी सांडशी गरम करून चटके दिले. त्यानंतर तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला, तर तुला जाळून टाकीन, घरात एकही माणूस ठेवणार नाही, अशी धमकी त्याने दिली.