Shirdi Crime: अहिल्यानगर जिल्ह्यातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरच्याशिर्डीमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना घडली. हा सगळा प्रकार सात अल्पवयीन मुलांनी केल्याचे तपासात उघड झालं. मृत व्यक्तीच्या चोरलेल्या मोबाईलमुळे या खुनाचा उलघडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचे अपहरण करुन त्याला लुटले आि नंतर त्याचा खून करण्यात आला. गणेश सखाहरी चत्तर (४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोपरगावचे गणेश चत्तर हे ८ जूनपासून बेपत्ता झाले होते. त्यानंत नांदुर्खी बुद्रुक इथल्या एका उसाच्या शेतात पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. त्या मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.
पोलिसांनी अधिक तपास केला असता मृत व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील गणेश चत्तर असल्याचे समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. पोलिसांनी गणेशचा मोबाईल नंबर मिळवला. गणेशचा मोबाइल अल्पवयीन मुलांनी एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकल्याचे समोर आलं. त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवसाची पार्टी केली. मात्र हाच मोबाईल त्यातीलच एका मलाने विकत घेतला आणि चालू केला. त्यामुळे पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आणि ते आरोपींपर्यंत पोहोचले.
रस्त्याने पायी जात असताना गणेश यांना नशेत असलेल्या अल्पवयीन मुलांनी त्यांचे अपहरण केले होते. उसाच्या कांडक्याने आणि हाताने मारहाण करुन त्यांचा गळा दाबण्यात आला. तितक्यात इतर दोघांनी त्यांच्यावर चाकूने वार करत त्यांची हत्या केली आणि मृतदेह उसाच्या शेतात टाकून मोबाइल काढून घेतला. पैशांसाठी मुलांनी हा मोबाईल विकला होता. मात्र तो पुन्हा सुरु केल्यानंतर या गुन्ह्याला वाचा फुटली आणि आरोपी सापडले. शिर्डी पोलिसांनी ७ अल्पवयीन मुलांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून आणि अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे घडत आहेत. काही दिवसांपूर्वी तीन जणांनी झोपलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खिशातून पैसे काढून त्याला मारहाण केली होती. त्यातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर साईबाबा संस्थानमध्ये काम करणाऱ्या तरुणांची हत्या करण्यात आली होती.