कोपरगाव : एकात्मिक ऊस व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब, बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बीजप्रक्रिया, लागवड, खते, तण आणि जलव्यवस्थापन याबाबतचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना सहज एकरी शंभर मेट्रिक टनापर्यंत उसाचे उत्पादन घेता येते, असा विश्वास निफाड कृषी संशोधन केंद्राचे कृषीतज्ज्ञ पोपट खंडागळे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रेलवाडीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा व्यापारी पिके ऊस विकास अभियानाअंतर्गत पांडुरंग लोंढे यांच्या शेतावर शेतकरी दिन व शिवार भेट कार्यक्रम बुधवारी (दि.२४) पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी शासनाच्या विविध कृषी योजना व सोयाबीन, कांदा पिकाबाबतचे व्यापारी धोरण व शाश्वत शेतीतून कृषीविकास कसा साधायचा, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी शिवाजी देवकर यांनी ऊस पिकात कांदा व इतर आंतरपिके कशी घ्यायची याबाबतचे मार्गदर्शन केले. कोपरगाव बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांनी कांदा लागवडीबाबतची माहिती दिली.
याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी माधुरी गावडे, संगीता खंडागळे, तुषार वसईकर, दिनकर कोल्हे, अनिरुद्ध घुगे, अविनाश पिंपळे, वसंत पावरा, संजय घनकुटे आदी उपस्थित होते तर माजी सरपंच पोपट पवार, आप्पासाहेब लोहकने, सोपान रक्ताटे, बाबासाहेब रक्ताटे, पांडुरंग लोंढे, किशोर गायकवाड, रमेश गायकवाड, अरुण देशमुख, चांगदेव लोंढे आदी शेतकऱ्यांनी ऊस व कांदा पिकाबाबत चर्चेत भाग घेतला.
फोटो२५- शेतकरी दिन- कोपरगाव