कुणी आडवं-तिडवं येऊ द्या, मी कोपरगावकरांच्या पाठीशी; सभापती राम शिंदे यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:49 IST2026-01-06T13:48:45+5:302026-01-06T13:49:02+5:30
कोपरगावात नगराध्यक्ष, नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा

कुणी आडवं-तिडवं येऊ द्या, मी कोपरगावकरांच्या पाठीशी; सभापती राम शिंदे यांची ग्वाही
कोपरगाव : मी आमदारांना शपथ देणारा आहे. कोपरगावच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना आता शपथ दिली आहे. आमचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून विरोधीपक्षसुद्धा माझ्याकडेच मागणी करतो. विवेक कोल्हे यांना सहकार्य करण्याएवढे माझ्याकडे वजन आहे. कुणीही आडवं-तिडवं येऊ द्या, तुमच्या पाठिशी मी आहे, असे आश्वासन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभव सेवा शपथ सोहळा सोमवारी (दि.५) कोपरगावात पार पडला. या सोहळ्यात सभापती शिंदे बोलत होते. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, सुमनताई संधान, मोनिका संधान, सचिन तांबे, राजेंद्र पिपाडा, संजय सातभाई, रवींद्र बोरावके, अॅड. जयंत जोशी, मनेष गाडे, अरुण येवले, विश्वासराव महाले आदी उपस्थित होते.
प्रारंभी गटनेते प्रसाद आढाव यांनी प्रास्ताविक केले. पराग संधान यांनी शंभर दिवसांत करावयाची शंभर कामे उपस्थितांसमोर मांडली. विवेक कोल्हे म्हणाले की, स्नेहलता कोल्हे आमदार असताना प्रा. राम शिंदे पालकमंत्री होते. त्यांनी कोपरगाव शहर विकासासाठी भरीव निधी दिला. आताही शिंदे यांनी कोपरगावचे पालकत्व स्वीकारावे अशी विनंती त्यांनी केली. स्नेहलता कोल्हे यांनी मतदारांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे काम आमचे नगराध्यक्ष व नगरसेवक करतील असा विश्वास दिला.
सभापती शिंदे पुढे म्हणाले की, आपली आता थेट कोपरगावपासून मुंबई आणि दिल्लीत सत्ता आहे. संधान तुम्ही कोपरगावचे पहिले भाजपचे नगराध्यक्ष आहात. स्नेहलता कोल्हे यासुद्धा कोपरगावच्या पहिल्या आमदार होत्या. त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही.
पुढाऱ्याच्या घरात जन्मलेल्या मुलात समजूतदारपणा
महाराष्ट्रात सध्या महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. उमेदवारी न मिळालेल्यांचा राडा-रपाटा सुरू असल्याचे आपण पाहतोय. परंतु २०२४ मध्ये विवेक कोल्हे यांनी पक्षासाठी, आपल्या नेतृत्वासाठी माघार घेतली.
विवेक कोल्हेंमध्ये हा समजूतदारपणा, परिपक्वता आहे. यावरून विवेक हा स्व. शंकरराव कोल्हे यांचा नातू शोभतो. पुढाऱ्या घरी जन्मलेल्या मुलात एवढा समजूतदारपणा आणि आलेला वार कसा परतून लावायचा, हे कसब विवेक कोल्हेमध्ये असल्याचे गौरवोद्गार राम शिंदे यांनी काढले.