लोकमत न्यूज नेटवर्क
घारगाव : घरातील कमावती व्यक्ती गमावल्याने संकटात सापडलेल्या कुटुंबीयांना व गरजूंना स्वखर्चाने भाजीपाला व किराणा वाटपाचा उपक्रम शिवसेनेचे तालुकाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांनी सुरू केला आहे. रविवारी या उपक्रमाला सुरुवात केली असून संपूर्ण तालुक्यात हा उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ग्रामीण भागातही दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा आलेख चढत चालला आहे. शासनाने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाने अनेक कुटुंबांतील कमावत्या व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी आहेर यांनी मदतकार्य सुरू केले आहे. कोरोनाच्या या संकटकाळात बोटा गटात जवळपास ५० कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने भाजीपाला व किराणा किट वाटप करण्यात आले. मदतकार्य करताना गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी घारगाव तरुणांच्या व मित्रपरिवाराच्या माध्यमातून संबंधित कुटुंबीयांना घरपोच भाजीपाला व किराणा किट देण्यात येत आहे. आहेर यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.