संगमनेरचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांची ‘ग्रेट भेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:48+5:302021-05-15T04:19:48+5:30

संगमनेर : ‘काका नमस्कार, आता कसे वाटते बरे वाटते ना?’ ‘आजी बघू तुमचा हात पुढे करा? रक्तातील ऑक्सिजन पातळी ...

'Great gift' from Sangamner prefect, tehsildar | संगमनेरचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांची ‘ग्रेट भेट’

संगमनेरचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांची ‘ग्रेट भेट’

संगमनेर : ‘काका नमस्कार, आता कसे वाटते बरे वाटते ना?’ ‘आजी बघू तुमचा हात पुढे करा? रक्तातील ऑक्सिजन पातळी पाहू, आता ठिक आहे’. ‘अरे दादा आला तेव्हा किती घाबरला होता, आता एकदम ठणठणीत बरा झाला तू, उद्याच घरी सोडतील तुला.’ ‘जेवण केलं का तुम्ही सर्वांनी?’ ही वाक्ये कुण्या डॉक्टरांची नाहीत. तर ती आहेत, संगमनेरच्या प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेबांची. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात सुरू केलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरला प्रशासकीय अधिकारी नित्याने भेट देतात. तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची ते आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांना आधार देत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाधित झालेले अनेक जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जायला नकार द्यायचे. शहराबरोबरच ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असताना स्थानिकांना येथील शासकीय रुग्णालयात उपचार मिळावे, यासाठी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यांच्या प्रयत्नांतून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू केले. रंगरंगोटी, वीज व जनरेटरची सुविधा, बेड पासून तर अगदी ऑक्सिजन पर्यंत अशी सर्वच यंत्रणा उभी करणे एक आव्हान होते. संगमनेरकरांनी दाखविलेल्या दातृत्वातून हे आवाहन अगदी सोपे झाले.

१ जून २०२० ते १२ फेब्रुवारी २०२१ दरम्यान हे सेंटर सुरू होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ते बंद करण्यात आले. मात्र, पुन्हा प्रादुर्भाव वाढत असताना सेंटर सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे ८२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आयसीयू कक्षात दहा रूग्ण तर ५८ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. यातील अनेक रुग्ण हे बाहेरगावचे आणि ग्रामीण भागातील आहेत. कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंबच बाधित होते. असे अनेक रुग्ण येथे उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा जेवणाचा डबा, चहा, नाष्टा देण्यासाठी कुणीही जवळ नसते. अशा रुग्णाचे हाल होऊ नयेत, म्हणून शहरातील काही सेवाभावी संस्था व नागरिक रुग्णांना जेवणाचे डबे मोफत पुरविण्याचे काम करत आहेत.

काही रुग्णांची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी भेट, संपर्क होत नसताना प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे, तहसीलदार निकम हे स्वत: रुग्णांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांच्यांशी संवाद साधतात. प्रत्येक रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांना आधार देतात. प्रशासकीय कामातून सवड काढत दररोज हे अधिकारी दिवसातून एकदा ग्रामीण रुग्णालय गाठतात. रुग्णांना देखील ते आल्यानंतर कुटुंबातील कुणी व्यक्ती आपल्याला भेटायला आल्यासारखे वाटते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, डॉ. सीमा घोगरे हे प्रत्येक रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत.

--------------------------

रुग्णांना प्रोनिंगचा सल्ला

पालथे, पोटावर झोपण्यास वैद्यकीय भाषेत प्रोनिंग असे म्हणतात. प्रोनिंगमुळे कोरोना बाधित रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी सुधारण्यास मदत होते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये प्रोनिंग करण्याचे फलक लावले आहेत. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना डॉक्टर प्रोनिंगचा सल्ला देत आहेत.

Web Title: 'Great gift' from Sangamner prefect, tehsildar