उसनवारीचे पैशावरून मित्राने केला मित्रावरच प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 13:49 IST2023-06-04T13:48:45+5:302023-06-04T13:49:07+5:30
संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील घटना

उसनवारीचे पैशावरून मित्राने केला मित्रावरच प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल
- रामप्रसाद चांदघोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
घारगाव (अहमदनगर) : उसनवारीचे पैशावरून मित्राने मित्रावरच चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.०३) रात्री ८ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे बुद्रुक येथील खंडोबा मंदिराजवळ घडली. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोरक्ष विठ्ठल वाकळे (रा. कोठे बुद्रूक, ता. संगमनेर) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर हल्ला करणारा त्याचा मित्र रॉकी भाऊसाहेब जाधव (रा. कोठे बुद्रूक, ता. संगमनेर) याला पोलिसांनी पकडले आहे.
कोठे बुद्रूक येथील खंडोबा मंदिराजवळ रस्त्यालगत गोरक्ष वाकळे व रॉकी जाधव या दोघा मित्रांमध्ये उसनवारीचे पैशावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन जाधव याने वाकळे याला शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे घटनास्थळी पोहोचले. जखमी वाकळे याला रुग्णवाहिकेतून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
हल्ला करणाऱ्या जाधव याचा पोलिसांनी शोध घेत त्याला पकडले. या प्रकरणी किरण पंडित सपकाळ (रा. कोठे बुद्रुक, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे करीत आहेत.