ज्ञानेश्वर कारखाना इथेनॉल निर्मिती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:29+5:302021-04-02T04:20:29+5:30
भेंडा : साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाला पर्याय म्हणून केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन व हमीभाव दिलेला आहे. यामुळे ज्ञानेश्वर कारखाना ...

ज्ञानेश्वर कारखाना इथेनॉल निर्मिती करणार
भेंडा : साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाला पर्याय म्हणून केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन व हमीभाव दिलेला आहे. यामुळे ज्ञानेश्वर कारखाना बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी दिली. लोकनेते मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दु. ३१) दुपारी ऑनलाईन पार पडली.
ज्येष्ठ संचालक ॲड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, तज्ज्ञ संचालक डॉ. क्षितीज घुले, काकासाहेब शिंदे, बबनराव भुसारी, शिवाजी कोलते, आदी उपस्थित होते.
नरेंद्र घुले म्हणाले, चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत १२ लाख १४ हजार ८५५ मेट्रिक टन उसाचे गळीत झाले. १२ लाख ७४ हजार ५५० साखरेच्या पोत्यांची निर्मिती झाली. साखर ठेवायला पक्के गोडावून शिल्लक नाही. यामुळे रस्त्यावर तात्पुरते गोडावून उभारून साखर साठवावी लागत आहे. ३ हजार १०० रुपये क्विंटल भाव असला तरी व्यापारी साखर उचलत नाही. महिन्याला असलेला ६० हजार क्विंटल साखरेचा कोटाही पूर्ण होत नाही. साखरेतून वाढलेला तोटा कमी करायचा असेल तर बी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉल निर्मिती करावी लागेल. १५ ते २० टक्के साखर उत्पादन कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
संचालक काकासाहेब नरवडे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी काही सूचना केल्या. यावेळी कॉ. बाबा आरगडे, जगन्नाथ कोरडे, अरुण गरड, सुदाम आरगडे, कॉ. अप्पासाहेब वाबळे, हरिभाऊ काळे, आदींनी प्रश्न उपस्थित केले. चार हजार सभासदांनी कोरोना व इतर कारणांनी सभेत सहभागी होता येत नसल्याचे सांगून सभेतील सर्व कामकाजाला पाठिंबा व संमती असल्याचे लेखी कळविल्याची माहिती कार्यकारी संचालकांनी सभेस दिली. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक ॲड. देसाई देशमुख यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी इतिवृत्त वाचन केले. सचिव रवींद्र मोटे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. संचालक मच्छिंद्र म्हस्के यांनी आभार मानले.