श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) ग्रामपंचायतीत आजी-माजी सरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमत करून २०१८ ते २०२० या आर्थिक वर्षात २६ लाख ८८ हजार ३५२ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विस्तार अधिकारी सारिका हराळ (रा. श्रीगोंदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे, माजी सरपंच संतोष माने, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर (रा. घारगाव) यांच्या विरोधात फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र काकडे, दादासाहेब मडके, स्वप्निल लाटे, एस. पी. जगताप यांनी लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत कारभाराच्या विरोधात वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार विस्तार अधिकारी व शाखा अभियंता यांनी चौकशी केली. यामध्ये आर्थिक अनियमितता, प्रशासकीय अनियमितता आणि गैरव्यवहार आढळून आला.
हा गुन्हा मागील आठवड्यात दाखल होणार होता. मात्र, पंचायत समिती प्रशासनाने वेळकाढूपणा केला. त्यावर सोमवारी राजेंद्र काकडे, दादासाहेब मडके, बंडू काकडे, भाऊसाहेब डांगे, गणेश जाधव, स्वप्निल लाटे यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. या उपोषणास माजी उपसभापती गणपतराव काकडे यांनी पाठिंबा दिला.
या संदर्भात गटविकास अधिकारी गोरक्षनाथ शेलार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली. क्षीरसागर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच सोमवारी सायंकाळी सारिका हराळ यांनी गुन्हा दाखल केला.
---
अटक करा, पैसे वसूल करा
आजी-माजी सरपंच, ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीत जवळपास २७ लाखांचा गैरव्यवहार केला आहे. याबाबत पंचायत समितीने गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २७ लाख वसूल करून या पैशातून गावात अद्ययावत व्यायामशाळा बांधावी, अशी मागणी उपोषणकर्ते राजेंद्र काकडे यांनी केली.
-----
ही गावाची बदनामी
लोणी व्यंकनाथचे आजी-माजी सरपंच व ग्रामसेवकांच्या विरोधात राजकीय सुडातून ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करून गावाची बदनामी करणाऱ्या मंडळींना धन्यवाद. आम्ही न्यायालयात या प्रकरणाचे ‘दूध का दूध और पानी का पानी’ करणार आहोत.
-मितेशकुमार नाहाटा,
उपसरपंच, लोणी व्यंकनाथ