मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:51 IST2025-11-26T13:47:03+5:302025-11-26T13:51:50+5:30
अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे मॉर्निंग वॉकदरम्यान अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
Congress Leader Kidnapped:अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. आरोपींनी गुजर यांना टिळकनगर परिसरातील निर्जन स्थळी नेऊन मारहाण केली आहे. गुजर हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी सातच्या दरम्यान कार मधून आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवत अपहरण केले होते. यानंतर आता मारहाण करणाऱ्यांनी यामागचे कारण सांगितले आहे.
अहिल्यानगरकाँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे बुधवारी सकाळी अपहरण करून त्यांना मारहाण केल्याने मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपातून ही मारहाण झाल्याचे म्हटलं जात होता. पण आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. खुद्द अपहरणकर्त्यांनीच एक व्हिडिओ शेअर करून यामागील खरे कारण उघड केले आहे.
अपहरण आणि मारहाणीमागचं खरं कारण उघड
या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण तापले असताना, मारहाण करणाऱ्या शिवप्रेमी चंदू आगे आणि त्यांच्या साथीदारांनी समोर येत एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओतून त्यांनी अपहरण आणि मारहाणीमागचे नेमके कारण स्पष्ट केले. चंदू आगे यांनी केलेल्या दाव्यानुसार, सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळेच संतापून शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी गुजर यांचे अपहरण केले आणि त्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी या प्रकरणी अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
"तिथून जात असताना सचिन गुजर मला तिथे दिसला. त्यावेळी मी त्याला तू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द का वापरतो, अरे तुरे का करतो असं विचारलं. त्यावर त्याने तुझा बाप लागतो का असं म्हटलं. त्यामुळे माझा राग अनावर झाला आणि मग मी त्याला बेलापूर रोडला दोन तीन फटके मारले. छत्रपती शिवरायांसाठी त्याला दोन फटके मारले मी खोटं बोलणार नाही. जे केलंय ते मान्य करणार. माझ्याविरोधात गुन्हा दाखल करायचा तर करा मी जामीनसुद्धा घेणार नाही," असं चंदू आगे म्हणाले.