Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 10:43 IST2025-11-26T10:38:33+5:302025-11-26T10:43:13+5:30
Sachin Gujar Kidnapped and Thrashed: श्रीरामपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करण्यात आले.

Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये बुधवारी (२६ नोव्हेंबर २०२५) सकाळी मोठी घटना घडली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांना कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी गुजर यांना टिळकनगर परिसरातील निर्जन स्थळी नेऊन मारहाण केली आहे. घटनेनंतर श्रीरामपूर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे .
काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत ओगले, काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण सासणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केले आहे. आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे. गुजर हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी सातच्या दरम्यान कार मधून आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवत अपहरण केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
आमदार ओगले यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसच्या तीन उमेदवारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अर्ज माघारीसाठी दणकाविण्यात आल्याचे ओगले यांचे म्हणणे आहे. गुजर यांचे अपहरण करणारे आरोपी हे स्वतःला हिंदुत्ववादी सांगतात. मात्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाही असे ओगले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
काँग्रेस पक्षाने श्रीरामपुरातील आपला प्रचार थांबवला आहे. निवडणूक ही दहशतीच्या बळावर लढवली जात आहे असा त्यांनी आरोप केला आहे. गुजर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.