"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:12 IST2025-10-05T16:00:28+5:302025-10-05T16:12:43+5:30
पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रतिटन ५ रुपये देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.

"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
CM Devendra Fadnavis: राज्यातील पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रतिटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीत १० रुपये घेतले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले असताना राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांवरचाच बोजा वाढवल्याचा आरोप विरोधकांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही शेतकऱ्यांना एफआरपीद्वारे मदत मागितली होती, परंतु काही साखर कारखाने मालकांनी आम्हाला विरोध केला. काही लोक या आपत्तीचे राजकारण करत आहेत पण आम्ही लवकरच शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ६० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. दुसरीकडे, यंदा म्हणजेच २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली ज्यात १ नोव्हेंबर पासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन १५ रुपये कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यातील ५ रुपये थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयावर अहिल्यानगर येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. "मागच्या काळात ज्यावेळेस उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की, तीस तीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहे. दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातून पाच रुपये हे शेतकऱ्यांकरिता बाजूला काढून ठेवा. ते पैसे एफआरपीमधून मागितले नव्हते. एफआरपीचे पैसे हे शेतकऱ्याचे आहेत. नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत. आपण जर विचार केला तर या ठिकाणी २०० कारखाने आहेत. फार फार तर २५ लाख रुपये एका शेतकऱ्यासाठी बाजूला काढून द्यायला सांगितलं. तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी असा गजब उभा केला. म्हणाले की शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे वसूल करत आहात. आम्ही शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत नाही आहोत तर आम्ही तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातून २५ लाख रुपये हे जो शेतकरी तुमच्याकडे शेतमाल टाकतो, तुमच्यासाठी राबराब राबतो, हाडाची काडं करतो, रक्ताचे पाणी करतो त्या शेतकऱ्यासाठी देत आहोत. अशा प्रकारची आपत्ती आल्यावर आम्ही तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तेव्हा तुम्ही मागे पुढे पाहता. आता मी असे काही कारखाने शोधून काढले आहेत. ज्यांच्याकडे शेतकऱ्याच्या मालाला काटा मारला जातो त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून तिथे पैसे जमा करताय आणि शेतकऱ्यांकरिता २५ लाख रुपये द्या म्हटलं की तुम्हाला देण्याची दानत नाहीये," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"तुम्ही मालक नाही आहात. त्या कारखान्याचा मालक आमचा शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहण्याचे काम सरकार निश्चितपणे करणार आहे आज आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे. अहिल्यानगर मध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस आला. ही लोकं आपत्तीचही राजकारण करू इच्छितात. पण त्यांना मी सांगतो की काळजी करू नका आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त काय मदत करता येईल या संदर्भात आराखडा तयार करायला सुरुवात केली आहे. तुम्ही आरशात पहा, तुम्ही असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं हे आधी दाखवून द्या आणि मग आमच्यावर टीका करा. आमच्यावर कोणीही टीका केली तरी आम्ही परवा करणारी लोक नाही आहोत," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.