अहमदनगर : महानगरपालिका व जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या शुक्रवारी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. शहरातील अधिकाधिक नागरिकांनी अर्ज दाखल करून शास्तीचा माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केले आहे.
अविनाश घुले म्हणाले, नागरिकांनी सन २०२०-२१ अखेर थकबाकीची व शास्ती पोटी ज्यांची रक्कम वीस हजार पेक्षा जास्त थकीत आहे, अशा मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. मालमत्ता कराच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या शास्ती रकमेवर तडजोड करण्यासाठी दिनांक २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले आहे. येथील जिल्हा न्यायालयात होणाऱ्या लोक अदालत साठी थकीत मालमत्ताधारकांनी सकाळी ९.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उपस्थित राहून ७५ टक्के शास्ती माफीचा फायदा घेऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सभापती घुले यांनी केले.