मंडळाधिकारी, तलाठी लाच घेताना अटक
By Admin | Updated: July 23, 2014 00:18 IST2014-07-22T23:26:57+5:302014-07-23T00:18:49+5:30
अहमदनगर/श्रीगोंदा : वीटभट्टीवरील पंचनाम्यानंतर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून ८० हजार रुपये स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले़
मंडळाधिकारी, तलाठी लाच घेताना अटक
अहमदनगर/श्रीगोंदा : वीटभट्टीवरील पंचनाम्यानंतर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून ८० हजार रुपये स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले़ कोळगावचे मंडळाधिकारी दत्तात्रय नाना साळुंके आणि भानगावचे तलाठी स्वप्नील प्रदीप होळकर, अशी
अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत़
मंडळाधिकारी आणि तलाठी यांनी तक्रारदार यांच्या वीटभट्टीेचा १७ जुलै रोजी पंचनामा केला होता. पंचनाम्यानंतर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे २१ जुलै रोजी ८० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती़ पैसे घेण्यासाठी २२ जुलै रोजी दुपारी एक वाजताची वेळ ठरली. त्यानुसार मंगळवारी श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयात सापळा लावला. यावेळी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या कार्यालयात मंडळाधिकारी दत्तात्रय नाना साळुंके आणि तलाठी स्वप्नील प्रदीप होळकर यांनी पंचासमक्ष पैसे स्वीकारले.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली. पोलीस उपअधीक्षक अशोक देवरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी, विजय मुर्तडक, पो़हेक़ॉ़ वसंत वाव्हळ, काशिनाथ खराडे, चालक अंबादास हुलगे, पोलीस नाईक प्रमोद जरे, रवींद्र पांडे, राजेंद्र सावंत,
नितीन दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
साळुंके हा श्रीगोंदा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या विभागात अव्वल कारकून म्हणून काम करीत आहे. त्याच्याकडे कोळगाव येथील मंडळाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता, तर होळकर भानगावचा तलाठी होता. अटकेतील दोघांना बुधवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)