अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:56 IST2025-11-24T12:55:08+5:302025-11-24T12:56:50+5:30
घुले यांचा कालावधी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात येईल

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे गत महिन्यात निधन झाले. त्यामुळे अध्यक्ष पदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांची आज सकाळी बैठक झाली. यावेळी अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने घुले यांची बिनविरोध निवड झाली.
घुले यांची निवड झाल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. घुले यांचा कालावधी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात येईल. त्यामुळे त्यांना आता तीन महिने अध्यक्षपदी राहता येईल.