राज्यात राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST2021-08-26T04:24:09+5:302021-08-26T04:24:09+5:30

नारायण राणे यांना आघाडी सरकारने अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शिर्डीत निदर्शने करण्यात आली. ठाकरे सरकारचा ...

Attempts to create political terrorism in the state | राज्यात राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न

राज्यात राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न

नारायण राणे यांना आघाडी सरकारने अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शिर्डीत निदर्शने करण्यात आली. ठाकरे सरकारचा निषेध व राणे यांना पाठिंबा दर्शविणारे फलक आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, रवींद्र गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, पोपटराव शिंदे, ताराचंद कोते, नितीन कोते, ॲड. रघुनाथ बोठे, बाबासाहेब डांगे, बाळासाहेब गाडेकर, भाऊसाहेब जेजूरकर, बाळासाहेब जपे यांची यावेळी उपस्थिती होती.

आघाडी सरकारचे अपयश व राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरू असलेल्या यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अस्वस्थ झाल्यामुळे सूडबुद्धीने अटकेची कारवाई केल्याची टीका विखे यांनी केली. यापूर्वी पंतप्रधान मोदी, फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केली गेली; परंतु तुमच्यावर कोणी गुन्हे दाखल केले नाहीत. आता तुमच्याकडून झालेली टीका आणि दसरा मेळाव्यातील भाषणाच्या जुन्या रेकॉर्ड काढून कारवाई करण्याची मागणी आम्हाला करावीच लागेल, असा इशाराही आमदार विखे यांनी दिला.

राणे यांच्या अटकेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि कार्यालयांवर हल्ले करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, ॲड. रघुनाथ बोठे यांचीही भाषणे झाली.

Web Title: Attempts to create political terrorism in the state