नगरमध्ये आदिवासी कुटुंबावर हल्ला: घरे जाळून टाकली; महिलांनाही मारहाण, ६ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:38 IST2025-03-26T12:37:04+5:302025-03-26T12:38:54+5:30

मारहाण करणाऱ्या जमावाने चव्हाण व भोसले यांची घरे पेटवून दिली. यात घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले.

Attack on tribal family in Nagar Houses burnt Women also beaten 6 injured | नगरमध्ये आदिवासी कुटुंबावर हल्ला: घरे जाळून टाकली; महिलांनाही मारहाण, ६ जखमी

नगरमध्ये आदिवासी कुटुंबावर हल्ला: घरे जाळून टाकली; महिलांनाही मारहाण, ६ जखमी

Ahmednagar Crime : जमिनीच्या वादातून श्रीगोंदा तालुक्यातील ठाणगेवाडी, येळपणे शिवारात जमावाने दोन आदिवासी कुटुंबीयांवर हल्ला करून त्यांची दोन घरे जाळून टाकली. यावेळी कुटुंबांतील पुरुषांसह महिलांनाही लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. सहाजण यात गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी चिमणी शंभू चव्हाण  यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात ठका रघू कोळपे, रामा रघू कोळपे, नीलेश ठका कोळपे, बंटी रामा कोळपे यांच्यासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चव्हाण कुटुंबीय ठाणगेवाडी, येळपणे शिवारात शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेजारी चिमाजी भोसले हे कुटुंबासह राहतात. चव्हाण याचे गावातील रघू कोळपे याच्याशी जमिनीचे वाद आहेत. याच वादातून सोमवारी कोळपे कुटुंबीय व त्यांच्या साथीदारांनी चव्हाण यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करत शंभू चव्हाण यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी फिर्यादीची मुलगी मध्ये आली असता, तिलाही मारहाण करण्यात आली. तसेच चव्हाण यांच्या शेजारी राहणारे चिमाजी भोसले व विजू भोसले यांनाही जमावातील लोकांनी लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मारहाण करणाऱ्या जमावाने चव्हाण व भोसले यांची घरे पेटवून दिली. यात घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले. या घटनेची फिर्याद दाखल झाल्यानंतर बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसलेही उपस्थित होते. संबंधित आरोपींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

गर्भवती मुलीला मारहाण
एका गर्भवती मुलीलाही जमावाने लाथाबुक्क्याने मारहाण केली. घटनास्थळी केवळ राख दिसत आहे. कोंबड्या देखील आगीत जळाल्या.

संसार उघड्यावर
चव्हाण व भोसले कुटुंबीयांना मारहाण करत घरे जाळल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. आरोपींनी कुटुंबांतील पुरुष सदस्यांना अतिशय बेदरकारपणे मारहाण केल्याने त्यांच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

Web Title: Attack on tribal family in Nagar Houses burnt Women also beaten 6 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.