अमित शाह यांनी घेतली बैठक; प्रतिमा टिकवा, मंत्र्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 05:18 IST2025-01-13T05:18:05+5:302025-01-13T05:18:54+5:30
भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या समारोपानंतर अमित शाह यांनी मंत्र्यांची बैठक घेतली.

अमित शाह यांनी घेतली बैठक; प्रतिमा टिकवा, मंत्र्यांना आदेश
शिर्डी : सरकारची प्रतिमा म्हणजे केवळ मुख्यमंत्र्यांची प्रतिमा नाही तर सर्व मंत्र्यांची प्रतिमा चांगली असणे आवश्यक आहे, त्याबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये असे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह यांनी राज्यातील भाजपच्या मंत्र्यांना स्पष्ट समज दिली.
भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या समारोपानंतर अमित शाह यांनी मंत्र्यांची बैठक घेतली. सूत्रांनी सांगितले की शाह यांनी बैठकीत सरकारच्या पारदर्शक कारभाराचा आग्रह धरला.
मोठ्या संघर्षानंतर महायुतीचे सरकार आले आहे.आपल्याला प्रचंड बहुमत मिळाले असल्यामुळे लोकांच्या अपेक्षादेखील खूप आहेत. अशावेळी सामान्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत.मंत्री कार्यालयातून पक्षाचे कार्यकर्ते नेते तसेच सामान्य माणसांना चांगली वागणूक दिली गेली पाहिजे असे त्यांनी बजावले.
मंत्र्यांच्या कामगिरीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमितपणे आढावा घ्यावा अशी सूचनादेखील त्यांनी केली.त्यानंतर शाह यांनी प्रदेश कोअर कमिटीची देखील बैठक घेतली.