माहेश्वरच्या धर्तीवर अहिल्यानगरचा विकास; महापौर निवडीनंतर महिनाभरात ४९२ कोटींची सुधारित पाणी योजना मंजूर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:27 IST2026-01-09T14:26:16+5:302026-01-09T14:27:52+5:30
निवडणूक होताच एक महिन्याच्या आत मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

माहेश्वरच्या धर्तीवर अहिल्यानगरचा विकास; महापौर निवडीनंतर महिनाभरात ४९२ कोटींची सुधारित पाणी योजना मंजूर करणार
अहिल्यानगर शहराला केवळ अहिल्यानगर नाव देऊन आम्ही थांबणार नाहीत, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात त्यांची राजधानी माहेश्वर सुसज्ज नगरी केली होती. त्याच पद्धतीने अहिल्यानगरचा विकास करण्यासाठी सर्व योजना राज्य सरकार इथे राबवणार आहे. महापालिकेने विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्याला निवडणूक होताच एक महिन्याच्या आत मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजप- राष्ट्रवादी (अजित पवार) युतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार बबनराव पाचपुते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, मोनिका राजळे, विक्रमसिंह पाचपुते, विजय चौधरी, जयदिप कवाडे, अनिल मोहिते, संपत बारस्कर, दिलीप भालसिंग, नितीन दिनकर, अॅड. अभय आगरकर, विनायक देशमुख, अशोक गायकवाड, अक्षय कर्डिले, सुनील रामदासी, राजेंद्र काळे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हे शहर ओळखले जाते. केवळ नामकरण करून सरकार थांबणार नाही. शहराच्या सर्वागिण विकासासाठी प्रयत्न केले जातील. महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. महापौर युतीचाच होईल. शहर विकास आराखड्यातील ३५० कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालेला आहे. महापालिकेत महापौर विराजमान झाल्यानंतर एक महिन्यात अमृत सुधारित पाणीपुरवठा योजनेचा ४९२ कोटींच्या प्रस्तावासह रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात येईल. शहर सुरक्षित व स्वच्छ बनविण्यासाठी शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी नवीन उद्योग आणले जातील. नॅशनल डिफेन्स कॉरिडॉरमध्ये अहिल्यानगरचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याने सर्वाधिक आमदार दिले. नगरपालिकेतही चांगले यश मिळाले. तेच चित्र महापालिकेतही दिसेल. जिल्ह्यात सुपा, शिर्डी एमआयडीसीचा झपाट्याने विकास होत आहे. अहिल्यानगर शहर आता थांबणार नाही. जिल्ह्यात विमानसेवा, रेल्वे, रस्ते, औद्योगिक विकासाचे जाळे निर्माण होत असून, त्यासाठी सरकारचे पाठबळ मिळत आहे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, अहिल्यानगर नामकरण झाल्यानंतर ही महापालिकेची पहिलीच निवडणूक आहे. काही लोक नाव बदलण्याची भाषा करत आहेत. परंतु, ते कदापि होऊ देणार नाही. विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
'सिस्पे' घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिस्पे, ग्रोमोअर अशा कंपन्यांनी आर्थिक घोटाळे केले आहेत. त्यामुळे गोरगरिबांचे पैसे बुडाले आहेत. या मागे कोण आहे, ते सर्वांना माहिती आहे. या घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून गोरगरिबांना लुटणाऱ्यांना सोडणार नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलून सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येईल. गरिबांना लुटणाऱ्यांना जेलची हवा खायला पाठवू
सीना नदीचे सुशोभिकरण
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, माझ्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे सीना नदीचे सुशोभिकरण, सौंदर्याकरण करण्यात येणार आहे. नागरिकांना तेथे फिरता येईल, अशी व्यवस्था तिथे केली जाईल.