अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:23 IST2025-09-29T16:21:52+5:302025-09-29T16:23:41+5:30
अहिल्यानगरमधील कोटला परिसरात सोमवारी आंदोलन करत असताना वाद वाढला आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
Ahilyanagar Violence: धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झाला. एका समाजातील व्यक्तींनी दुसऱ्या समाजातील धर्मगुरूंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढल्यावरून दगडफेकीचा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, ज्या रांगोळीवरून या वादाला तोंड फुटलं, ती रांगोळी काढणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
अहिल्यानगर शहरातील कोटला परिसरात एका समाजातील गटाकडून धर्मगुरूबद्दल रांगोळी काढणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून उठण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतर तणाव वाढला आणि जमावाने दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.
रांगोळी काढणाऱ्याला अटक
ज्या व्यक्तीने रांगोळी काढली होती. त्या व्यक्तीला पोलिसांनी रविवारीच अटक केली आहे. कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, ज्याने रांगोळी काढली होती, त्याला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आंदोलन करण्याची गरज नव्हती.
शेख अल्तमश सलीम जरीवाला या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीमध्ये म्हटले होते की, वाडिया पार्क बारातोटी कारंजा येथे रस्त्यावर रांगोळी काढलेली होती. त्यात धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने नाव लिहिलेले होते. आरती रासकर, संग्राम रासकर (बारातोटी कारंजा) यांनी ही रांगोळी काढली होती, असेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी आंदोलन करताना दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या ३० ते ३५ जणांनाही ताब्यात घेतले आहे.