नीलेश घायवळचे आणखी एक प्रकरण समोर; दवानाखान्यात निघालेल्या कुटुंबावर हल्ल्याचा रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:47 IST2025-11-09T14:47:12+5:302025-11-09T14:47:36+5:30
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर, नीलेश घायवळसह एकाचा सहभाग

नीलेश घायवळचे आणखी एक प्रकरण समोर; दवानाखान्यात निघालेल्या कुटुंबावर हल्ल्याचा रचला कट
Ahilyanagar Crime: पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आरपीआयचे (आठवले गट) अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून जिवे ठार मारण्याच्या कटात नीलेश घायवळ सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घायवळ व त्याचा साथीदार ऋषी गायकवाड याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
नान्नज येथील बाजारतळ परिसरात दहा ते बाराजणांनी साळवे यांच्या कुटुंबावर लाठ्या, काठ्या लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजेदरम्यान घडली होती. यासंदर्भात अभिजित संपत साळवे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात १२ आरोपींसह दोन अनोळखी अशा १४ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींची चौकशी करत असताना या हल्ल्याचा कट कुख्यात गुंड नीलेश घायवळ व त्याचा साथीदार ऋषी गायकवाड याने रचना असल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. नीलेश घायवळ हा मूळचा सोनेगाव (ता.जामखेड) येथील आहे. पुणे शहरात त्याच्याविरोधात खून, खंडणी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दहशत माजविणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सुनील साळवे व त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे, असे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सुनील साळवे व त्यांच्या कुटुंबावर २४ ऑगस्ट रोजी जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत पुण्यातील गुंड नीलेश घायवळ याचे नाव समोर आले असून, त्याचा या कटात सहभाग असल्याचे पुरावे हाती आले आहेत. त्याच्यासह त्याच्या साथीदाराला आरोपी करण्यात आले आहे. सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक
काय आहे प्रकरण
याप्रकरणी अभिजित संपत साळवे यांनी फिर्याद दिली. सुनील साळवे फिर्यादीचे चुलते आहेत. ते सर्व नान्नज गावात राहतात. २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्यादरम्यान फिर्यादीचा भाऊ यशदीप व त्याच्यासोबतच्या आदर्श सुनील साळवे, दिग्विजय आबू सोनवणे यांच्यावर वैभव विजय साबळे, सार्थक विजय साबळे, अभय कृष्णाराजे भोसले, ओम गोरे, कल्याण मोहळकर यांनी दगड, लोखंडी गज, काठीने हल्ला केला. त्यात यशदीप गंभीर जखमी झाला. त्याला सुनील साळवे यांनी उपचारासाठी जामखेड येथील रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात येण्यास सांगितले. तेव्हा सुनील साळवे यांनी फिर्यादीला घरून पैसे इतर लोकांना घेऊन येण्यास सांगितले. फिर्यादी, त्यांची चुलती रतन साळवे, रेश्मा साळवे, सोना भालेराव, अरविंद भालेराव असे पाचजण चारचाकी वाहनातून जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात गाठले व त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
आरपीआयने केले होते आंदोलन
या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयसह विविध संघटनांनी आंदोलने केली होती. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार शोधून त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. तपासात कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा हात असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
पासपोर्टवरही अहिल्यानगरचा पत्ता
आरोपी नीलेश घायवळ याच्यावर पुण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर तो विदेशात पसार झाला. पोलिसांनी त्याचा पासपोर्ट शोधून काढला. त्यावर अहिल्यानगर शहरातील आनंदी बाजार परिसरातील पत्ता होता, पण तो तिथे राहत नव्हता. तसे पोलिसांनी कळविलेही होते. तरीही त्याला याच पत्त्यावर पासपोर्ट मिळाला होता.