शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 23:28 IST2025-09-30T23:27:43+5:302025-09-30T23:28:37+5:30

या भिक्षेकऱ्यांना राहाता न्यायालयासमोर करण्यात आले हजर

56 beggars in police custody in Shirdi Beggars from 7 states including Maharashtra included | शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

शिर्डी: साईबाबांच्या शिर्डी शहरात भिक्षेकऱ्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिर्डी पोलिस स्टेशनने ३० सप्टेंबर रोजी व्यापक भिक्षेकरी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण ५६ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले, ज्यात महाराष्ट्रासह ७ राज्यांतील व अहिल्यानगरसह ११ जिल्ह्यांतील ४७ पुरुष आणि ९ महिला भिक्षेकऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसांनी या भिक्षेकऱ्यांना राहाता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाच्या आदेशाने पुरुष भिक्षेकऱ्यांची विसापूर, तर महिला भिक्षेकऱ्यांची चेंबूरला रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली. शिर्डीतील श्रीसाईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, संस्थानचे सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी व शिर्डी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली.

या मोहिमेत नोंदणीकृत भिक्षेकऱ्यांमध्ये केवळ स्थानिकच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतून, तसेच परराज्यातून आलेल्या लोकांचा समावेश आहे. एकूण ५६ भिक्षेकऱ्यांपैकी बहुतांश लोक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील आहेत.

साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. या भिक्षेकऱ्यांची नोंद घेऊन त्यांना योग्य पुनर्वसन किंवा त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्याच्या दृष्टीने ही मोहीम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शिर्डीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि भाविकांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण देण्यासाठी पोलिसांनी हा उपक्रम राबविलेला आहे.

परराज्यांतील भिक्षेकऱ्यांची नोंद

पोलिसांनी नोंदवलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राबाहेरील ६ राज्यांतील ७ भिक्षेकरी शिर्डी परिसरात आढळले आहेत. यात बिहार (१), कर्नाटक (१), आंध्र प्रदेश (२), गुजरात (१), मध्यप्रदेश (पुरुष : १, महिला : १), उत्तर प्रदेश (२) आणि छत्तीसगड (१) या राज्यांचा समावेश आहे.

Web Title: 56 beggars in police custody in Shirdi Beggars from 7 states including Maharashtra included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.