संगमनेरमधील बोटा परिसरात २.८ रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 12:02 IST2019-09-09T11:58:28+5:302019-09-09T12:02:34+5:30
संगमनेर तालुक्यातील बोटा गावासह अकलापूर येथे सोमवारी सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला आहे.

संगमनेरमधील बोटा परिसरात २.८ रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोटा गावासह अकलापूर येथे सोमवारी (९ सप्टेंबर) सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला आहे. २.८ रिस्टर स्केल तीव्रतेचा हा धक्का असल्याचे भू-वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
बोटा व परिसरात गेल्या वर्षीही ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसले होते. त्यावेळी या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली असून, त्याची तीव्रता २.८ रिस्टर स्केल असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी 'लोकमत'ला सांगितले.
दरम्यान, मागील वर्षी पठारभागातील घारगाव, माहुली, नांदूर खंदरमाळ, बोरबन, कोठे आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. यावेळी घारगाव परिसरात भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील मेरी संस्थेचे शास्त्रज्ञ, संगमनेरचे तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी भेट देऊन नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले होते.