सध्या कडक निर्बंध पाळले जात असले तरी कोविड चाचण्यांची संख्या वाढल्याने व काही चाचणी अहवाल उशिरा प्रात होत असल्याने बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तालुक्यातील १९१ पैकी ६८ गावांनी कोरोनाला वेशीबाहेर थोपविले ही जमेची बाजू आहे. मात्र १२३ गावात कोरोना धडकला आहे म्हणून ६८ गावांची चिंता वाढली आहे.
खानापूर येथील शंभर बेडचे शासकीय कोविड सेंटर, कोतूळ येथील ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर पूर्ण भरले आहे. अनेक रूग्ण संगमनेरला खाजगी उपचार घेत आहे. तसेच गावोगावी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखरेखीखाली कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.
नागरिकांचा बेजबाबदारपणा, प्रशासनाचे अपुरे बळ आणि नागरिकांची जबाबदारी पासून पळापळ या गोष्टीमुळे तालुक्यातील कोरोनाचा आकडा वाढून विस्फोट होताना दिसत आहे.
मंगळवारी १२५, बुधवारी १४२, गुरूवारी केवळ रॅपिड अँटिजन ३४ सह शंभरच्या पुढे अशी बाधितांची संख्या वाढत आहे. १५१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहे.
..........
तहसीलदारांची बैठक
गुरुवारी तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या दालनात मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांचेसह वैद्यकीय अधिकारी यांची तातडीची बैठक पार पडली. अगस्ती आश्रमातील नव्या भक्त निवास येथे कोविड सेंटर सुरू करण्याविषयी चर्चा झाली. अकोले शहरात सहा डाॅक्टरांनी एकत्र येऊन कोविड केअर केंद्र सुरू केले. ग्रामीण भागातील कोतूळ, राजूर, समशेरपूर या मोठ्या गावांत तेथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी एकत्र येऊन कोविड केअर उपक्रम राबवावा. त्याला सहकार्य करू, असे आवाहन आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी केले आहे.