देवाच्या चरणी लीन होणारा सुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 13:08 IST2019-12-13T13:08:47+5:302019-12-13T13:08:53+5:30
सत्य सनातन धर्म हाच या देशाचा पाया आहे.

देवाच्या चरणी लीन होणारा सुखी
सोलापूर : सत्य सनातन धर्म हाच या देशाचा पाया आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आदर करण्याची हिंदू संस्कृती असून, अयोध्येत राममंदिर होण्यासाठी सर्वधर्मीयांनी प्रयत्न केले आहेत, हीच प्रभू रामचंद्राची इच्छा होती, असे श्री देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी प्रवचनात सांगितले. देवाच्या चरणी जीवन अर्पण करणारा प्रत्येकजण सुखी होतो, असेही महाराज म्हणाले.
गुरुवारी उद्धव चरित्र, रुक्मिणी विवाह, रास पंचाध्यायी या विषयावर प्रवचन झालं. यावेळी प्रवचन देताना देवकीनंदन ठाकूर महाराज म्हणाले, देवाच्या चरणी जीवन अर्पण करणारा कायम सुखी असतो. सत्य सनातन धर्म हाच या देशाचा पाया आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा, हा देश हिंदूंचा आहे मात्र इथे इतर धर्मीय देखील गुण्यागोविंदाने राहतात, हेच या धर्माचे वैशिष्ट्य आहे.
देशातील कोणत्याही व्यक्तीने अथवा राजकीय पक्षाने सनातन धर्माची अवहेलना करू नये. ज्या देशात जन्म झाला, त्या देशाच्या संस्कृती-सभ्यतेचा आदर करा, भाईचारा ठेवला तरच सर्वधर्मसमभाव टिकून राहील. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम मंदिर उभारण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयानेही मान्य केले की, अयोध्या हे श्रीरामांचे जन्मस्थळ आहे. मंदिर उभारणे ही प्रभू श्रीरामांचीच मर्जी आहे. त्यामुळे अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण होणार आहे.
मानवी जीवन ईश्वर प्राप्तीसाठी आहे. त्यामुळे देवासमोर कधीच खोटं बोलू नका. साधू-संत हे देवाचे रूप असतात, त्यांच्यासोबत कपट करू नका, अन्यथा त्याचे कठोर फळ भोगावे लागेल, म्हणून जीवनात कपट ठेवू नका. आपल्या सामर्थ्यानुसार दान करा, समाजसेवा करताना दिखावा करू नका, असंही देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी सांगितले.
श्री भागवत कथेचा गुरुवारी सहावा दिवस होता. नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या हस्ते भगवत गीतेची आरती करून प्रवचनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संतोष गालपल्ली, दिगंबर लगशेट्टी, रमेश झालगे, अविनाश दासरी, मारुती महिंद्रकर, रामकृष्ण सुंचू, संतोष कामून यांची प्रमुख उपस्थिती होती.