खूनसत्रावर उपचाराची नस पोलिसांना सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:27 PM2018-04-26T23:27:10+5:302018-04-26T23:27:10+5:30

शांत शहर म्हणून ओळख असलेल्या यवतमाळात दर आठवड्याला खुनाची घटना घडत आहे. दिवसाढवळ्या खून होत आहे. जानेवारीपासून चार महिन्यात एक-दोन नव्हे तब्बल १४ खून झाले. आरोपी पोलिसांच्या हातीही लागत आहे.

Police could not detect the bloodshed | खूनसत्रावर उपचाराची नस पोलिसांना सापडेना

खूनसत्रावर उपचाराची नस पोलिसांना सापडेना

Next
ठळक मुद्देचार महिन्यात १४ खून : नवख्यांची मानसिकता ओळखण्यात अपयश

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शांत शहर म्हणून ओळख असलेल्या यवतमाळात दर आठवड्याला खुनाची घटना घडत आहे. दिवसाढवळ्या खून होत आहे. जानेवारीपासून चार महिन्यात एक-दोन नव्हे तब्बल १४ खून झाले. आरोपी पोलिसांच्या हातीही लागत आहे. मात्र खुनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. पोलीस यंत्रणेच्या अनेक मर्यादा या खून सत्राने उघड झाल्या. प्रत्येक खुनात नवीनच आरोपी असतात. नवख्या आरोपींची मानसिकता ओळखण्यात अपयश आल्याने पोलिसांना उपचाराची नसही सापडत नाही.
यवतमाळ शहराची ओळख गुन्हेगारांचे शहर अशी होऊ लागली आहे. येथील गुन्हेगारीचा प्रश्न थेट विधिमंडळातही गाजला. शहरात खुनाचे सत्र सुरू आहे. एकट्या यवतमाळ शहरात जानेवारी ते २५ एप्रिलपर्यंत तब्बल १४ खून झाले. भर रस्त्यात, वर्दळीच्या ठिकाणी खुनाच्या घटना घडत आहे. या खुनांमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक दहशतीत आले आहे. खून झाला की पोलीस आरोपींना तातडीने अटक करतात. पुढची कारवाई होते. परंतू खुनाचे सत्र थांबविण्यासाठी पोलिसांकडे कोणतेच नियोजन दिसत नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही म्हणून पोलीस हात वर करतात. नवघ्याना कसे ओळखायचे, कुणाचे कोणाशी वैर आहे याची माहिती मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या घटना सातत्याने वाढत आहे.
शहरात घडलेल्या प्रत्येक खुनामागील कारणांची मिमांसा केली तर त्यात वेगवेगळी कारणे आढळून येतात. सावकारीपासून भाईगिरीपर्यंत सर्वच कारणांचा यात समावेश आहे. अल्पवयीन आणि नवयुवकही दिवसाढवळ्या खून करण्यात मागे नाही. यवतमाळ शहरातील गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी पोलिसांचे योग्य नियोजनच दिसत नाही. विधिमंडळात गुन्हेगारीची मुद्दा गाजल्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरले.काही दिवस वाहनधारकांची तपासणी केली. मात्र आता ही मोहिमही थंड बस्त्यात पडली आहे. खून होताच मात्र आरोपींनाही अटक करतोच की असे अफलातून उत्तर दिले जाते. पोलीस ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून मुक्कामी कर्मचारी आहे. त्यांना प्रत्येक हालचालीची माहिती सुद्धा मिळते. परंतु कारवाई करण्याची मानसिकता नाही. केवळ आपले पद कायम ठेवण्यासाठी तजविज केली जाते. याला बाहेरुन आलेल्या अधिकाऱ्यांनाही भक्कम साथ दिली जाते. जमादाराकडे बीट सोपविण्यात येते. त्यावर अधिकाºयाचे नियंत्रण असते. परंतू प्रत्यक्षात कोणाचे लक्ष दिसत नाही. दिलेला कार्यक्रम राबवून सोपस्कार पूर्ण करण्याची मानसिकता झाली आहे. याच कारणामुळे खुनाच्या सत्रावर उपचाराची नस पोलिसांच्या हाती सापडत नाही.
नव्या आकृतीबंधाची गरज
शहर पोलीस ठाण्यानंतर अवधूत वाडी ठाणे तयार झाले. त्यानंतर लोहारा ठाण्याचीही निर्मिती झाली. मात्र येथे पुरेसा अधिकारी-कर्मचारी वर्ग नाही. शहराची लोकसंख्या अडीच लाखाच्या घरात आहे. त्या तुलनेत पोलीस अधिकारी, कर्मचारी नाही. मंजूर असलेला आकृतीबंध हा १५ वर्षापूर्वीचा आहे. त्यातही अनेक पदे रिक्त आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची गरज आहे. राजकीय मानसिकता नसल्याने नवीन आकृतीबंध तयार होत नाही.

Web Title: Police could not detect the bloodshed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा