गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 12:19 PM2023-01-21T12:19:46+5:302023-01-21T12:26:20+5:30

इंझाळा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते

Inzala village were facing the water scarcity, teacher donated his land along with a well for the villagers | गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान

गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान

googlenewsNext

विठ्ठल कांबळे

घाटंजी (यवतमाळ) : दातृत्वाच्या भावनेने न्हाऊन निघालेल्या एका शिक्षकाला गावकऱ्यांची तहान सहन झाली नाही. गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी त्यांनी आपली तीन लाख रुपये खर्चुन नुकतीच खोदलेली विहीर व सभोवतालची सुमारे अडीच हजार स्केअर फूट जागा गावाला दान दिली.

सुरेश तुकाराम कस्तुरे, असे त्या दातृत्त्वाचे धनी असलेल्या शिक्षकाचे नाव. तालुक्यातील इंझाळा येथील ते रहिवासी आहे. त्यांच्या कुटुंबात सात एकर शेतजमीन आहे. वडिलांच्या नावे तीन, तर त्यांच्या नावे चार एकर शेती आहे. सुरेश यांनी ९ महिन्यांपूर्वी शेतात ३० फूट विहीर खोदली. तिला भरपूर पाणी लागले. बांधकामासह तीन लाख रुपये खर्च केला. घरी आई, वडील, पत्नी आणि दोन मुले, असे त्यांचे कुटुंब आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ते शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

इंझाळा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकावे लागते. आता गावात जलजीवन मिशनअंतर्गत दोन विहिरींचे खोदकाम करण्यात आले. परंतु त्या विहिरींना पाणीच लागले नाही. ही समस्या सुरेश कस्तुरे यांनी जाणली. दुसऱ्याच्या सुख-दुख:त धावून जाणारे त्यांचे ८३ वर्षीय वडील तुकाराम कस्तुरे यांनी त्यांना प्रोत्साहित केले. गावातील भूदान चळवळीचे प्रवर्तक माजी खासदार दिवंगत सदाशिवराव ठाकरे यांची प्रेरणा घेऊन कस्तुरे यांनी ग्रामपंचायतीला आपली जमीन दान देण्याचा निर्णय घेतला.

सुरेश कस्तुरे यांनी जागा व विहीर ग्रामपंचायतीकडे दान म्हणून देत असल्याची कागदपत्रे दान म्हणून देत असल्याची कागदपत्रे सरपंच वैजयंती ठाकरे, ग्रामसेवक अमोल जनगमवार व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत सुपूर्द केली. मानवी मुल्याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा तो स्वकेंद्रित परिघाच्या पुढे जातो. त्या अर्थाने 'स्व'च्या मर्यादेपलीकडे जाऊन माणुसकीच्या वलयात शिरायचे तर स्वकेंद्रित प्रवुत्तीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडावे लागते. तेव्हा देण्यामागे अथवा दानामध्ये संपन्नता येते. जे काही आपण देऊ शकतो, ते दिल्याने केवळ ज्याला लाभ झाला त्यालाच सुख वाटते असे नाही. ज्यांनी दिले त्यालाही संतोष वाटतो, हेच गुरुजी कस्तुरे यांच्या कृतीतून यानिमित्ताने दिसून आले.

आई-वडिलांच्या शिकवणुकीमुळे केले दानपत्र

पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत होती. सर्वांना पिण्याचे पाणी मिळावे या प्रांजळ हेतूने ग्रामपंचायतीला अडीच हजार स्केअर फूट जागा व तीन लाख रुपये खर्चून व पक्क्या  बांधकामासह असलेली ३० फूट खोल खोदलेली, भरपूर पाणी असलेली विहीर दान दिली. ग्रामपंचायतीकडे तसे रितसर दानपत्रही लिहून दिले. आई-वडिलांची शिकवण आणि त्यांच्या प्रेमामुळे शक्य होईल, ते समाजासाठी थोडे फार करतो आहे, अशी भावना सुरेश कस्तुरे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

Web Title: Inzala village were facing the water scarcity, teacher donated his land along with a well for the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.