मुले पळविणाऱ्या टोळीची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:57 PM2018-06-05T23:57:04+5:302018-06-05T23:57:11+5:30

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रीय झाल्याचा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होताच, ती टोळी वणी, झरी भागात फिरत असल्याच्या कंड्या पिकविल्या गेल्या आणि नागरिकांच्या उरात धडकी भरली.

 Children's Panic Panic | मुले पळविणाऱ्या टोळीची दहशत

मुले पळविणाऱ्या टोळीची दहशत

googlenewsNext
ठळक मुद्दे झरीत अफवांचे पेव, नागरिकांची जागल : सोशल मीडियावर व्हायरल झाला मेसेज

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रीय झाल्याचा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होताच, ती टोळी वणी, झरी भागात फिरत असल्याच्या कंड्या पिकविल्या गेल्या आणि नागरिकांच्या उरात धडकी भरली. झरी तालुक्यात या अफवेने कहर केला असून मुलांचे अपहरण करणाºया टोळीच्या दहशतीने लोक रात्रीच्यावेळी जागल करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांचे अपहरण करणारे तीन हजार लोक राज्याच्या विविध भागात फिरत असल्याचा मेसेज सोशल मिडियातून व्हायरल होत आहे. ज्याच्या व्हॉटस्वर हा संदेश येतो, तो कोणतीही शहानिशा न करता अन्य लोकांना पाठवित आहे. त्यामुळे हा संदेश वाºयासारखा पसरला. झरी तालुक्यात या विषयातील अफवांचे पेव फुटले असून संपूर्ण तालुका गेल्या काही दिवसांपासून दहशतीखाली आहे. अशा अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले असले तरी लोकांच्या मनातील दहशत मात्र अजुनही कायम आहे.
एखादा गावात कुणी नवखा माणूस गेला तर त्याच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे रात्री-बेरात्री कुण्या गावात जाणे लोक टाळत आहेत. अनेक गावांत लोक रात्रीच्यावेळी जथ्या-जथ्याने फिरत असल्याचे चित्र या भागात पहावयाला मिळत आहे. अमूल गावात ही टोळी दिसली, तमूक गावांतून मुले पळविली, अशा अफवा वेगाने पसरत आहेत.
या भागातील नागरिकांचे नातलग तेलंगाणा आंध्रप्रदेशात मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. त्या राज्यांमध्येदेखील अशा अफवा असून तेलंगाणा, आंध्रप्रदेशातील लोक झरीतील आपल्या नातलगांना दूरध्वनी करून सतर्क राहण्याचा सल्ला देत असल्याने दहशतीत भरच पडत आहे.
घाबरू नका, कोणत्याही टोळ्या नाहीत -ठाणेदार
झरी तालुक्यातील पिंपरड, मार्की या गावांतील युवक रात्रीच्यावेळी गस्त घालत असून दोन दिवसांपूर्वी या गावांमध्ये रात्रीच्यावेळी काही नवखे लोक आले असता युवकांनी त्यांचा पाठलाग करून पिटाळून लावल्याची माहिती आहे. असाच प्रकार अनेक गावांमध्ये घडत आहे. पोलिसांच्या मते, या निव्वळ अफवा असून यात कोणतेही तत्थ्य नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये, अशा कोणत्याही टोळ्या या भागात सक्रीय झाल्या नसल्याचे पाटणचे ठाणेदार शिवाजी लष्करे यांनी स्पष्ट केले आहे.
घोन्सात घरांवर दगडफेक
एकीकडे मुले पळवनू नेणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरली असतानाच रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घोन्सा येथे काही घरांवर अज्ञात टवाळखोरांनी दगडफेक करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. टिनपत्र्याच्या घरावर दगडफेक झाल्याने त्याच्या आवाजाने संबंधित घरातील लोक तत्काळ घराबाहेर आले. परिसरातील लोकही एकत्र आले. शोध घेतला असता, कुणीही दिसले नाही.

Web Title:  Children's Panic Panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा