जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:36 PM2018-08-09T23:36:21+5:302018-08-09T23:36:53+5:30

शासकीय नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी मराठा समाज बांधवांच्यावतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वर्धा जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला असून गुरूवारी वर्धा शहरात दुचाकी रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी दिवसभर ठिय्या दिला.

Composite response to the district | जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

Next
ठळक मुद्देआरक्षणासाठी मराठ्यांचे आंदोलन : दोन ठिकाणी मोर्चे, वर्धेसह हिंगणघाट, आर्वी व पुलगावात ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासकीय नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी मराठा समाज बांधवांच्यावतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वर्धा जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला असून गुरूवारी वर्धा शहरात दुचाकी रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी दिवसभर ठिय्या दिला. वर्धा शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमधील बाजारपेठेतील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठांने आज छोट्या व मोठ्या व्यावसायिकांनी स्वत:च बंद ठेवून सदर आंदोलनाला आपला मुकपाठींबाच दिला. वर्धासह हिंगणघाट, पुलगाव, आर्वी येथे मराठा समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. तर आर्वीत सरकारच्या मराठा आरक्षण विरोधी धोरणांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. सदर आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला होता.
शिवाजी चौकात ठिय्या तर जिल्हा कचेरीसमोर निदर्शने
मराठा समाज बांधवांच्यावतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिवाय जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात अ‍ॅड. गजेंद्र जाचक, भास्कर इथापे, सुनील अंभोरे, लक्ष्मण चौधरी, पुखराज मापारी, संदीप भांडवलकर, प्रा. प्रशांत जाचक, शिवाजी इथापे, अर्चित निघडे, नितीन शिंदे, अरूण चव्हाण, प्रकाश कोल्हे, पृथ्वीराज शिंदे, दीपक कदम, कुणाल मोरे, सचिन खंडारे, दीपक चुटे, आशू शिंदे, सुचित फासगे, नितीन फासगे, पराग जगदळे, संघर्ष खोसे, प्रमोद चव्हाण, प्रथम काळे, अमीत चव्हाण, सुमीत भांडवलकर, उमाकांत डुकरे, राजू गिरमकर, जयश्री पाटणकर, पौर्णिमा अंभोरे, सुनीता इथापे, संगीता चव्हाण, सपना इंगळे, भारती वाघ, संगीता मापारी, भाग्यश्री निघडे, मंगला हिवाळे, रश्मी शिंदे, कविता काळे, उषा निकम, राखी भोसले, जया काकडे, विजया निंबाळकर, सचिता रहाटे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.
बसफेऱ्यांना फटका
मराठा समाज बांधवांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदामुळे गुरूवारी सकाळी ११ नंतर रापमची प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. सकाळी ११ वाजेपर्यंत बस फेऱ्या सोडल्यानंतर पोलिसांकडून मिळाली सूचना व रापमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्यात आलेल्या बसेस जिल्ह्यातील पाचही आगारात रवाना करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बंदमुळे रापमच्या बसची चाके गुरूवारी थांबली तरी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचा आधारच नागरिकांना होता. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी लांब पल्ल्याच्या गाड्या कमी प्रमाणात सोडल्या तरी वर्धा-नागपूर मार्गावर २४ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्यात आली.
विद्यार्थ्यांची तारांबळ
शिक्षणासाठी जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर या ठिकाणी दररोज परिसरातील गावांमधील विद्यार्थी येतात. सकाळी ११ वाजेपर्यंत रापमची बस सेवा सुरू राहिल्याने अनेक विद्यार्थी गुरूवारी शाळा, महाविद्यालयात पोहोचले; पण सकाळी ११ वाजता नंतर रापमची बस सेवाच बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची परतीच्या प्रवासासाठी चांगलीच तारांबळ उडाली होती. काही तास बसच्या प्रतीक्षेनंतर ग्रामीण विद्यार्थ्यांनी मिळेल त्या वाहनाने परतीचा प्रवास केला.

Web Title: Composite response to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.