वाळूचोरट्यांनी पोखरले अडीच किलोमीटरचे नदीपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:04 PM2019-05-31T22:04:21+5:302019-05-31T22:04:35+5:30

देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे यशोदा आणि भदाडी नदीचा संगम असून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा होता. या वाळूसाठ्यावर वायगाव (निपाणी) येथील वाळूचोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी तब्बल अडीच किलोमीटरचे पदीपात्र पोखरले आहे. त्यामुळे लगतच्या गावकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

2.5km river bed planted by sand bars | वाळूचोरट्यांनी पोखरले अडीच किलोमीटरचे नदीपात्र

वाळूचोरट्यांनी पोखरले अडीच किलोमीटरचे नदीपात्र

googlenewsNext
ठळक मुद्देवायगावच्या चोरट्यांचा धुडगूस : यशोदा नदीपात्रात दिवस-रात्र होतोय उपसा, प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे यशोदा आणि भदाडी नदीचा संगम असून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा होता. या वाळूसाठ्यावर वायगाव (निपाणी) येथील वाळूचोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी तब्बल अडीच किलोमीटरचे पदीपात्र पोखरले आहे. त्यामुळे लगतच्या गावकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वाळूघाट बंदी असल्याने वाळू चोरट्यांनी गावातील नदी, नाल्यांवर आपला मोर्चा वळविला आहे. याचा फटका सोनेगाव (बाई) येथील नदी, नाल्यांनाही बसला आहे. सोनेगाव येथे यशोदा व भदाडी नदीचा संगम होऊन ती पुढे टाकळी (चणा) व सरुळकडे वाहत जाते. या नदीपात्रात वाळूसाठा असल्याने वायगाव (निपाणी) येथील वाळू चोरट्यांनी या नदीपात्रात दिवस-रात्र उपसा सुरू केला आहे. पहाटेपासूनच ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू चोरी होत आहे. बघता-बघता या चोरट्यांनी सोनेगा ते टाकळीपर्यंत जवळपास अडीच की.मी.चे नदीपात्र पोखरुन टाकले आहे. नदीपात्राच्या अड्यालपड्याल शेती असल्याने पावसाळ्यात शेतकरी याच नदीतून ये-जा करतात. आता नदीपात्रात मोठे खड्डे पडल्याने धोका निर्माण झाला आहे. या चोरट्यांनी वाळू उपसा करुन वायगाव आणि वडद परिसरात साठवणूक करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत साठविलेली वाळू जप्त करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांच्या आशीर्वादाने वाळूचोरटे सैराट
या परिसरात महसूल विभागापेक्षा पोलीस विभागतच वाळूचोरट्यांवर नजर ठेवून असतात. रात्रीच्यावेळी वायगाव रस्त्यावर वाळूची वाहने अडविण्याचे काम पोलीसच करताना दिसत आहे. या वाळूच्या वाहनचालकांकडून हप्त्याची रक्कमही वसूल करीत असल्याची ओरड होत आहे. विशषेत: वायगावातील वाळू चोरटेच पोलिसांचे मध्यस्थ असल्याने सोनेगावातून बेदरकारपणे वाळूउपसा करीत आहे. पोलीस व महसूल विभाग खिशात असल्याचे सांगून आम्हीच आमच्या मर्जीचे राजे, अशा आविर्भावात वागून नदीपात्राची वाट लावत आहेत. त्यामुळे आता पोलीस विभाग व महसूल विभाग वाळूचोरांवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
युवकाला धक्काबुक्की केल्याची पोलिसांत तक्रार
नदीपात्रातून अवैध वाळूउपसा करणाऱ्यांना हटक ले तर ते अंगावर चाल करून येतात. त्यांना पोलिसांचा वरदहस्त असल्याने तेही निर्ढावलेले आहेत. वाळूचोरीची माहिती अधिकाऱ्यांना देत असल्याच्या कारणावरून वायगावातील तिघांनी सोनेगावच्या विजय फुके नामक युवकाला धक्काबुक्की केली. या प्रकरणी युवकाने वाटगुळे, झाडपे व आणखी एकाविरुद्ध देवळी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

Web Title: 2.5km river bed planted by sand bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू