राजन विचारेंना हितशत्रूंचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:28 AM2019-03-14T00:28:30+5:302019-03-14T00:30:49+5:30

पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी; राष्ट्रवादीचा थांगपत्ता नाही; काँग्रेसची अवस्थाही बिकटच

Rajan's thoughts are the risk of interest | राजन विचारेंना हितशत्रूंचा धोका

राजन विचारेंना हितशत्रूंचा धोका

googlenewsNext

- अजित मांडके

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात युतीच्या नगरसेवकांची संख्या ३२ असून राष्ट्रवादीचा येथे भोपळा आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला येथे मोठे आव्हान असणार आहे. या मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकछत्री अंमल असल्याने विचारेंसाठी ही जमेची बाजू असली, तरी अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याविरोधात खदखद असल्याचेही बोलले जात आहे. ही खदखद मतदानातून दिसली, तर त्याचा फटका विचारेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, शिवसेनेत आदेश महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आदेश आला तरच त्यासाठी काम केले जाईल, असेही येथील शिवसेनेचे पदाधिकारी खाजगीत बोलत आहेत.

ठाणे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून युती झाली असल्याने शिवसेनेचे राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मागील निवडणुकीत विचारे यांना मोदीलाटेमुळे पाच लाख ९५ हजार ३६४ मते, तर राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना तीन लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात नाईक यांना विचारेंच्या तुलनेत नगण्य मते पडली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती न झाल्याने शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात झाला होता. त्यावेळी भाजपाच्या संदीप लेले यांनी जोरदार प्रचार केला होता. परंतु, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची या पट्ट्यातील ताकद पाहता, त्यांचा प्रभाव कामी आला नव्हता. त्यानुसार, यावेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना तब्बल एक लाख ३१६ मते, तर भाजपाचे संदीप लेले यांना ४८ हजार ४४७ मते मिळाली होती.

कॉंग्रेसचे मोहन गोस्वामी यांना १७ हजार ८७३ मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार बिपिन महाले यांना एकूण मतदानाच्या अवघ्या दीड टक्कयाच्या आसपास म्हणजेच दोन हजार ५६५ मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे या मतदारसंघात पानिपत झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर, झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे येथे उरलेसुरले नगरसेवकसुद्धा शिवसेना आणि भाजपामध्ये डेरेदाखल झाल्याने राष्ट्रवादीसोबतच कॉंग्रेसलाही याठिकाणी भोपळासुद्धा फोडता आला नाही. कॉंग्रेसचे मनोज शिंदे यांचासुद्धा यावेळी प्रथमच पराभव झाला होता. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ३२, तर भाजपाचे चार नगरसेवक विजयी झाले आहेत. याशिवाय, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वजन पाहता, या सर्वांचा फायदा विचारे यांना होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत स्थानिक पातळीवर असलेली नाराजी विचारेंसाठी डोकेदुखी ठरू शकते. येथील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी विचारे यांच्या कामकाजावरून नाराज असल्याचे कार्यकर्ते दबक्या आवाजात सांगतात. गॅस पाइपलाइनचे काम त्यांच्या माध्यमातून झाले असले, तरी तेसुद्धा अर्धवट आहे. कोपरी पोस्ट आॅफिसचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु, आजही अनेक प्रश्न सुटले नसल्याने, विचारे यांच्यावर येथील पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय घडामोडी
विधानसभा निवडणुकीत संदीप लेले यांनी एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
अनेकांचा शिवसेना-भाजपात प्रवेश : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोपरी भागातील कॉंग्रेस आणि राष्टÑवादीच्या विद्यमान भरत चव्हाण, मालती पाटील, लक्ष्मण टिकमानी, संजय घाडीगावकर आदींसह इतर आजीमाजी नगरसेवकांनी शिवसेना व भाजपामध्ये प्रवेश केल्याने येथे युतीसाठी पोषक वातावरण आहे.

Web Title: Rajan's thoughts are the risk of interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.