सुसंवादानेच होते आयुष्य सफल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:59 PM2019-04-10T13:59:29+5:302019-04-10T13:59:57+5:30

जर आपण घरातील मंडळीबरोबर, शेजाºयांशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी दिलखुलासपणे आपल्या विचारांचे, अनुभवांचे, छंदाचे, सुख - दु:खाची आदान - प्रदान करून सुसंवाद साधल्यास आपले आयुष्य खºया अर्थाने आनंदी आणि सफल तर होईलच त्याचबरोबर आयुष्य निरोगी आणि तणावमुक्त राहील.

Successful life was successful! | सुसंवादानेच होते आयुष्य सफल !

सुसंवादानेच होते आयुष्य सफल !

Next

माझे नेहमीचे आवडते विषय सोडून एखाद्या नवीन विषयावर लिखाण करण्याची माझी इच्छा झाली. काल रात्रीचे दोन वाजता काही सूचले म्हणून ते शब्दरुपात देत आहे. संवाद म्हणजे आपल्या मतांची केलेली आदान-प्रदान किंवा देवाण-घेवाण होय. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं मी शाळेत असल्यापासून शिकलोय. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार सर्व प्राणी स्वत:चा विकास करत करत आता या स्थितीला आले आहेत. मनुष्याची उत्क्रांती ही माकडांपासून झाली असंही म्हंटलं जातं. जर हे खरं असेल तर माकड हा सुद्धा समाजप्रिय प्राणी असून ते एकत्रित कुटुंबात सुसंवाद करीत आनंदाने राहतात हे आपण आजही पाहतोच.

शालेय जीवनात माझे चाळीतील घर, माझी चाळ, शाळा, मैदाने या ठिकाणी घरातील मंडळीशी, शेजारी राहणारे मंडळीशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी नेहमी सुसंवाद असायचा. उदा. मी ज्या चाळीत राहत होतो तेथे चाळीत राहणाºया सर्वांशी सुसंवाद असायचा. चाळीतील मित्रांशी तर मैदानी खेळ, गप्पा, छंद, कला, अभ्यास, संध्याकाळच्या कट्ट्यावरील चर्चा यातून होणाºया सुसंवादामुळे सर्वांशी एकदम घट्ट नातं, जवळीकता आणि आपुलकीची भावना असायची. स्वत:च्या अगदी छोट्या ते मोठ्या गोष्टी या सर्वांबरोबर सुसंवाद साधून मनाला एक वेगळा आनंद आणि समाधान मिळायचा. 

वैद्यकीय कॉलेज जीवनात मी होस्टेलवर राहत होतो तिथे तर मला माझ्या आयुष्याला कलाटणी देणाºया अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. हे फक्त शक्य झाले ते माझ्याबरोबरचे, वरिष्ठ आणि कनिष्ठ मित्रांच्या सान्निध्यात त्यांच्या सहवासात राहून केलेल्या सुसंवादामुळे. हे सुसंवाद करीत असताना मला अनुभवास मिळालेला प्रत्येकाच्या विचारातील विविधता, व्यवहार चातुर्य, माझ्यातील व्यक्तिमत्त्व विकासातील वाढ, आत्मविश्वास, पैशांची किंमत, घरच्या लोकांची किंमत, एकमेकांमधील स्पर्धा, एकत्रित केलेल्या अभ्यासाचा फायदा, आयुष्याचे ध्येय गाठण्याची जिद्द आणि मित्रामधील प्रेम व आपुलकी हे कधी शिकलो हे कळलेच नाही. 

मी आजही सर्वांशी सुसंवाद साधण्यासाठी माझा बराच वेळ देतो. उदा. आठवड्यातील दोन रविवार माझ्या घरी माझ्या अनेक क्षेत्रातील मित्रांना न्याहरीसाठी बोलावतो. त्यांच्याबरोबर तीन ते चार तास मस्त आणि दिलखुलासपणे गप्पा मारतो. सुसंवादाचे अनेक फायदे असून त्यात प्रामुख्याने स्वत:चे विचार,आनंद ,सुख, दु:ख,वेदना, समस्या, ज्ञान, कौशल्य आणि कलेची आपल्या जवळील / प्रिय व्यक्तींशी देवाणघेवाण करून आपले आयुष्य सफल, तणावमुक्त आणि आनंदी घालविता येते.

मागील काही वर्षांमध्ये मनुष्याची जीवनशैली झपाट्याने बदलून ती त्याच्या स्वत:भोवती केंद्रित झालेली दिसते. आज प्रत्येक मनुष्य हा कारण नसताना अनेक गोष्टींमुळे व्यस्त झाला आहे. विज्ञानात प्रचंड प्रगती झाली तरी आपण एका गोष्टीमध्ये मागासलेले होत जातोय ते म्हणजे आपापसातील सुसंवाद. मागील काही वर्षांपासून मनुष्यामधील सुसंवाद कमी होत चाललाय. जर अशीच परिस्थिती पुढील एक दोन पिढी राहिल्यास ‘मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे’ हे इतिहास जमा होईल यात शंका नाही. हल्ली बहुमतांचं आयुष्य हे त्यांच्या स्वत:च्या पुरतेच मर्यादित होताना दिसते. एका सर्वेक्षणाच्या आधारे भारतातील प्रत्येक व्यक्ती दररोज सरासरी दीड ते दोन तास मोबाईल आणि एक तास टीव्हीमध्ये घालवितो. याचाच अर्थ तो त्याच्या हातातील ६ बाय ३ इंचच्या मोबाईल आणि २९ इंचच्या टीव्हीच्या विश्वातच गुरफटून तो एकलकोंडा झाला आहे. हल्ली मनुष्याचे एकमेकातील संवाद कमी झाल्याने एकमेकातील प्रेम आणि संबंध कमी होताना दिसतात यामुळे बरेच मानसिक आजार जडतात.  

जर आपण घरातील मंडळीबरोबर, शेजाºयांशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी दिलखुलासपणे आपल्या विचारांचे, अनुभवांचे, छंदाचे, सुख - दु:खाची आदान - प्रदान करून सुसंवाद साधल्यास आपले आयुष्य खºया अर्थाने आनंदी आणि सफल तर होईलच त्याचबरोबर आयुष्य निरोगी आणि तणावमुक्त राहील.
- डॉ. व्यंकटेश मेतन
(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Successful life was successful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.