महामार्गावरील ‘शॉर्टकट’ ठरताहेत जीवघेणे!, छेदरस्त्यांचा होईना वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:07 PM2023-10-30T12:07:14+5:302023-10-30T12:08:05+5:30

दुचाकी दुभाजकावर चढवून महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न

The shortcuts on the highway are fatal, the use of intersections | महामार्गावरील ‘शॉर्टकट’ ठरताहेत जीवघेणे!, छेदरस्त्यांचा होईना वापर

महामार्गावरील ‘शॉर्टकट’ ठरताहेत जीवघेणे!, छेदरस्त्यांचा होईना वापर

कऱ्हाड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ओलांडणासाठी छेदरस्ता, पायपूल आहे; पण स्थानिकांनी अनेक ठिकाणी ‘शॉर्टकट’ बनवलेत. संरक्षक जाळीची मोडतोड करून तसेच दुभाजकाचे कठडे फोडून स्थानिक महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. पायी चालत नव्हे, तर चक्क दुचाकी दुभाजकावर चढवून महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न होतोय आणि हाच जीवघेणा प्रयत्न अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय.

पुणे-बंगळुरू महामार्ग छेदरस्त्याशिवाय ओलांडता येऊ नये, यासाठी सातारा व कोल्हापूर लेनच्या मध्यभागी दुभाजक बांधण्यात आले आहेत. तसेच कऱ्हाडनजीक दुभाजकावर संरक्षक जाळीही उभारण्यात आली आहे. मात्र, तरीही कठडे फोडून तसेच संरक्षक जाळीचे लोखंडी रेलिंग कापून ‘शॉर्टकट’ बनविण्यात आले आहेत. भुयारी मार्ग, छेदरस्ता, पायपुलाकडे जाण्यासाठी वाढीव प्रवास करावा लागतो. त्यामध्ये वेळ जातो. हे टाळण्यासाठीच असे ‘शॉर्टकट’ बनविण्यात आले आहेत. मात्र, महामार्गावरील हे ‘शॉर्टकट’ अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.

‘शॉर्टकट’मधून अचानक कोणीतरी आडवे येते. त्यावेळी चालकाला वाहन नियंत्रित होत नाही आणि पादचारी, दुचाकीस्वाराला धडक देऊन संबंधित वाहन पुढे मार्गस्थ होते. गत दोन वर्षांत असे शेकडो अपघात घडले आहेत. मात्र, तरीही अनेकजण जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडताना दिसतात.

अपघाती ठिकाणे

शिवडे फाटा, इंदोली फाटा, उंब्रज फाटा, खोडशी, वहागाव, कोल्हापूर नाका, कोयना वसाहत
नांदलापूर फाटा, पाचवड फाटा, मालखेड फाटा

जोडरस्ते बनवले कोणी..?

महामार्गावरून सेवा रस्त्यावर जाण्यासाठी काही अधिकृत जोडरस्ते आहेत. मात्र, महामार्गानजीक अनेक ढाबे, हॉटेल आणि व्यावसायिकांनी अनधिकृतपणे जोडरस्ते बनवलेत. हे जोडरस्तेही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

पायपूल असून अडचण, नसून खोळंबा

कऱ्हाडमध्ये कोल्हापूर नाक्यानजीक महामार्ग ओलांडण्यासाठी पायपूल आहे. मात्र, या पायपुलाचा क्वचितच वापर होतो. बहुतांश नागरिक धोकादायकरीत्या शॉर्टकटनेच महामार्ग ओलांडतात.

Web Title: The shortcuts on the highway are fatal, the use of intersections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.