तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 02:00 PM2023-06-29T14:00:54+5:302023-06-29T14:36:25+5:30

नराधमाने कोयता कोठून आणला? हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून केला आहे का? याची देखील चौकशी केली जाणार

who attacked a young woman with a knife was remanded in pune police custody for four days | तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी

तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी

googlenewsNext

पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीला बुधवारी (२८ जून) सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

शंतनू लक्ष्मण जाधव (२१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून त्याने मंगळवारी (२७ जून) सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. हल्ला झालेल्या २० वर्षीय मुलीने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाधववर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीवर हल्ला करत असतानाच जाधव याला लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी पकडले. त्यामुळे या हल्ल्यातून तरुणी बचावली. त्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी चोप देऊन जाधव याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अटक केल्यानंतर जाधव याला बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी जाधव याला एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक पूनम पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

आरोपीच्या रक्ताचे होणार रासायनिक विश्लेषण 

आरोपी जाधव याच्या रक्ताचा नमुना घेऊन तो रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा पुढील तपासासाठी वापर होणार आहे. तर जाधव याने कोयता कोठून आणला, याबाबत त्याकडे तपास करायचा आहे. हा गुन्हा जाधव याने कोणाच्या सांगण्यावरून केला आहे का? याचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. वर्षाराणी जाधव यांनी केला. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचादेखील पोलिस तपास करीत असल्याचा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला.

Web Title: who attacked a young woman with a knife was remanded in pune police custody for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.