भरधाव एसटी बसची पादचारी महिलेसहित क्रुझरला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 03:02 PM2024-03-13T15:02:20+5:302024-03-13T15:08:07+5:30

मिनी एसटीचे नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला असून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील ६ जण जखमी झाले आहेत

Speeding ST bus hits cruiser with woman pedestrian Woman died on the spot 6 injured | भरधाव एसटी बसची पादचारी महिलेसहित क्रुझरला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी

भरधाव एसटी बसची पादचारी महिलेसहित क्रुझरला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी

मंचर: भरधाव वेगातील मिनी एसटी बस पादचारी महिला आणि क्रुझर गाडीला धडक देत घरावर जाऊन धडकली. या विचित्र अपघातात पादचारी महिलेचा झाला असून एसटीतील सहाजण जखमी झाले आहेत. हा अपघात वळती गावच्या हद्दीतील भोकरवस्ती येथे सकाळी नऊ वाजता झाला आहे. वत्सला किसन भोर( वय 65 रा. वाळुंजवस्ती वळती) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

नारायणगाव एसटी आगाराची मिनी एसटी बस नारायणगाव येथून शिंगवे गावाकडे निघाली होती. एसटी बसमध्ये चालक, वाहक व पाच प्रवासी होते. वळती गावच्या वाळूजवस्तीमध्ये राहणाऱ्या वत्सला किसन भोर (वय 65) या पंढरपूर येथे जाण्यासाठी भोकरवस्ती बस थांब्याकडे निघाल्या होत्या. घरापासून सहाशे फूट अंतरावर रस्त्याने पायी जात असताना मागून भरधाव वेगातील एसटी बस आली व तिने वत्सला यांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित झालेली एसटी बस रस्त्यालगत वीस फूट अंतरावर असलेल्या क्रुझर गाडीला धडकून एका घरात घुसली. एसटीच्या धडकेने क्रुझर गाडीचे नुकसान होऊन घराची सिमेंटची भिंत तुटली गेली. 

वत्सला यांचा एसटी बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर एसटीतील प्रवासी कल्याणी सुनील बनकर (वय 34), कांताबाई मच्छिंद्र मंडलिक (वय 62), सविता बाळशीराम बनकर (वय 60), रंजना मैफत नाईक (वय 70), सुनिता चंद्रकांत बनकर (वय 47 सर्व रा.वारूळवाडी) व एसटी गाडीच्या वाहक अर्चना राम मोरे (वय 36 रा. मेदनकरवाडी चाकण) हे सहा जण अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान अपघातानंतर वत्सला किसन भोर या एसटी गाडीच्या चाकाखाली अडकल्या होत्या. क्रेन आणून एसटी बस बाजूला घेऊन त्यांना बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अरुण फुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस कर्मचारी टी एस हगवणे, जी ए डावखर, एक के दळवी, आर एस तनपुरे यांनी घटनास्थळी जाऊन वाहने बाजूला काढली. दरम्यान वत्सला भोर यांच्या पाठीमागे पती, तीन मुले असा परिवार आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याने एसटी चालक संजय रोहिदास माने (रा. नारायणगाव मूळ रा. निलंगा) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Speeding ST bus hits cruiser with woman pedestrian Woman died on the spot 6 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.