साखर उताऱ्यात एक टक्का घट; सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन

By नितीन चौधरी | Published: December 7, 2023 04:02 PM2023-12-07T16:02:02+5:302023-12-07T16:02:22+5:30

गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

One percent reduction in sugar consumption 16 lakh tonnes of sugar production in the state in one and a half months | साखर उताऱ्यात एक टक्का घट; सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन

साखर उताऱ्यात एक टक्का घट; सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन

पुणे : राज्यात एक नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या साखर हंगामाला सव्वा महिन्यांचा काळ उलटला असून १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याची घट झाली आहे. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात एक नोव्हेंबरला ऊस गाळप सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, त्यानंतर दिवाळी आल्याने प्रत्यक्षात गाळपास उशिरा सुरुवात झाली. त्यातही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे साखर कारखाने सुरू होण्यास विलंब झाला. राज्यात सध्या ८८ सहकारी व ९२ खाजगी असे एकूण १८० साखर कारखाने ऊसगाळप करत आहेत. कोल्हापूर विभागामध्ये २१ सहकारी व ११ खासगी असे एकूण ३२ कारखाने तर पुणे विभागात १६ सहकारी व ११ खाजगी असे २७ कारखाने ऊसगाळप करत आहेत. सोलापूरमध्ये सहकारी १५ व खाजगी २९ असे ४४ कारखाने, नगर विभागात १४ सहकारी व १० खासगी असे २४, औरंगाबाद विभागामध्ये १३ सहकारी ९ खासगी असे ११, नांदेड विभागात ९ सहकारी व १९ खासगी असे २८ तर अमरावती दोन तर नागपुरात एक खासगी कारखाना गाळप हंगामात सहभागी झाला आहे.

आतापर्यंत २०२.४४ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून १६.३५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. सर्वाधिक साखर उत्पादन पुणे जिल्ह्यात ३.९ लाख टन तर सोलापूर विभागात ३.०४ लाख टन उत्पादन झाले आहे. कोल्हापूर विभागात ३.२, नगर विभागात २.२ लाख टन उत्पादन झाले आहे. यंदाच्या उसगाळप हंगामात पहिल्या सव्वा महिन्यात आतापर्यंत केवळ ८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी हाच साखर उतारा ८.८७ टक्के इतका होता. राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात ८.९५ टक्के मिळाला आहे. अमरावती विभागात केवळ दोन खासगी कारखाने सुरू असले तरी तेथे साखर उतारा ८.४९ टक्के आल्याचे साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पुणे विभागात ८.३३, सोलापूर विभागात ७.३९ नगर विभागात ७.९६, नांदेड विभागात ८.१२, तर औरंगाबाद विभागात सर्वात कमी ६.८३ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

पावसाने ओढ दिल्याने ऊस वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच साखर उतारा कमी मिळाल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. याचा परिणाम लागवडीवरदेखील झाला असून गाळप हंगाम यंदा आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील, अशी शक्यताही कारखानदार व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी याच काळात राज्यात १९२ साखर कारखाने सुरू होते. त्यातून २७८ लाख टन उसाचे गाळ होऊन २४ लाख टन साखर उत्पादित झाली होती.

Web Title: One percent reduction in sugar consumption 16 lakh tonnes of sugar production in the state in one and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.