Pimpri Chinchwad: उद्योगनगरीत कडकडीत बंद, मराठा समाजाचा एल्गार; लाठीमाराचा मोर्चातून निषेध

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: September 9, 2023 03:34 PM2023-09-09T15:34:53+5:302023-09-09T15:35:40+5:30

बंद व महामोर्चात शहरातील शेकडो संस्थांनी सहभाग नोंदवत निषेध केला...

Udyognagari closed, Elgar of Maratha community; Protest of lathi on the agitation from the march | Pimpri Chinchwad: उद्योगनगरीत कडकडीत बंद, मराठा समाजाचा एल्गार; लाठीमाराचा मोर्चातून निषेध

Pimpri Chinchwad: उद्योगनगरीत कडकडीत बंद, मराठा समाजाचा एल्गार; लाठीमाराचा मोर्चातून निषेध

googlenewsNext

पिंपरी : अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर अमानुष लाठीमार करण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज (दि. ९) पिंपरी-चिंचवड शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. तसेच महामोर्चाही काढण्यात आला. बंद व महामोर्चात शहरातील शेकडो संस्थांनी सहभाग नोंदवत निषेध केला. तसेच शहरातील आजी-माजी आमदार, विविध पक्षांच्या शहराध्यक्षांनीही हजेरी लावली होती.

मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहर वतीने बंद पुकारण्यात आला होता. तसेच निषेध मोर्चाचेही आयोजन केले होते. सकाळी १०.३० वाजता पिंपरी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पिंपरीतील डिलक्स चौकमार्गे मेन बाजार मार्गाने महामोर्चा पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जालना येथील घटनेच्या निषेध करून सांगता करण्यात आली. शहर बंदला पाठींबा म्हणून शहर व उपनगरांमध्ये पूर्णपणे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता व्यावसायिकांनी आपापले दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत पाठींबा दर्शवला.

बंदचा परिणाम...

निगडी, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, पिंगळेगुरव, पिंपळे सौदागर भागातील सर्व दुकाने सकाळपासून बंद होते. अनेक कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये बंद होती. काही महाविद्यालयांनी परीक्षेचे पेपर रद्द केले. पुणे-मुंबई, पुणे-नाशिक आणि मुंबई-बंगळुरू महामार्गांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांची संख्या तुरळक होती. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठा, मंडई, पीएमपी बसथांबे, रेल्वे स्थानकांवर गर्दी कमी होती. तर एमआयडीसीतील काही कारखान्यांनी कामगारांना सुट्टी दिली होती.

एकच मिशन मराठा आरक्षण...

एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एकच मिशन मराठा आरक्षण, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

Web Title: Udyognagari closed, Elgar of Maratha community; Protest of lathi on the agitation from the march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.