Pimpri Chinchwad Police: पिंपरी-चिंचवडच्या १३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रद्द

By नारायण बडगुजर | Published: March 5, 2024 03:06 PM2024-03-05T15:06:47+5:302024-03-05T15:08:13+5:30

‘मॅट’च्या दणक्यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून आदेश

Transfers of 13 police inspectors of Pimpri Chinchwad canceled | Pimpri Chinchwad Police: पिंपरी-चिंचवडच्या १३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रद्द

Pimpri Chinchwad Police: पिंपरी-चिंचवडच्या १३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रद्द

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या इतर घटकांमध्ये बदल्या केल्या होत्या. त्याबाबत काही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणकडे (मॅट) धाव घेतली. मॅटच्या आदेशानंतर बदली झालेल्या ६५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या रद्द केल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील १३ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सर्व घटक प्रमुखांकडून बदलीपात्र पोलिस निरीक्षकांची माहिती मागवली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांची त्यांच्या घटकातून इतर घटकात बदली केली होती. या बदली आदेशाच्या विरोधात काही पोलिस निरीक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतली.

मॅटने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बदली आदेशाची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २१ फेब्रुवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित घटक प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर पुणे शहर (२), पिंपरी-चिंचवड (१३), ठाणे शहर (७), विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र (१) अशा एकूण २३ पोलिस निरीक्षक जे २१ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित घटकात कार्यकारी पदावर कार्यरत होते. त्यांना आयोगाच्या निकषाप्रमाणे जिल्ह्याबाहेर बदली करण्यापासून सवलत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महासंचालक कार्यालयाकडून देखील ४२ पोलिस निरीक्षकांची बदलीबाबत पडताळणी केली. त्यानंतर एकूण ६५ पोलिस निरीक्षकांची बदली रद्द करण्याचे आदेश दिले. अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी याबाबतचे आदेश दिले.

बदली रद्द झालेले पिंपरी-चिंचवड दलातील पोलिस निरीक्षक

शंकर डामसे, शैलेश गायकवाड, शंकर बाबर, ज्ञानेश्वर साबळे, दीपाली धाडगे, प्रसाद गोकुळे, सुनील पिंजण, विश्वजित खुळे, बाळकृष्ण सावंत, दीपक साळुंखे, शहाजी पवार, अरविंद पवार, अनिल देवडे.

यांचीही बदली झाली रद्द

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात इतर घटकातून बदलून आलेल्या १३ अधिकाऱ्यांची बदली रद्द झाली. यात नागपूर शहर दलातील पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे, विश्वनाथ चव्हाण, विनोद चौधरी, बापू ढेरे, दीपक गोसावी, अमित डोळस, संग्राम शेवाळे, अमोल देशमुख, राजेंद्रकुमार सानप, बबन येडगे, भारत कऱ्हाडे, तसेच ठाणे शहर दलातील निरीक्षक मनोज शिंदे आणि डीआयजी गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अमोल फडतरे यांची पिंपरी-चिंचवड दलात बदली झाली होती. त्यांचीही बदली रद्द झाली.     

Web Title: Transfers of 13 police inspectors of Pimpri Chinchwad canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.