बाप झालेल्या आईमुळे तिने गाठले यशोशिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:08 AM2018-06-16T03:08:42+5:302018-06-16T03:08:42+5:30

यशाचे शिखर गाठायचे म्हटले, की मनाची तयारी व त्याला जोड लागते ती अथक परिश्रम करण्याचे मग कोणतेही काम करा, त्यात यश हे निश्चित असते. ना वडिलांची छाया ना भावाचा आशीर्वाद.

She reached Sucesse due to her mother | बाप झालेल्या आईमुळे तिने गाठले यशोशिखर

बाप झालेल्या आईमुळे तिने गाठले यशोशिखर

Next

- शिवप्रसाद डांगे
रहाटणी - यशाचे शिखर गाठायचे म्हटले, की मनाची तयारी व त्याला जोड लागते ती अथक परिश्रम करण्याचे मग कोणतेही काम करा, त्यात यश हे निश्चित असते. ना वडिलांची छाया ना भावाचा आशीर्वाद. त्यामुळे घरची परिस्थिती तशी बेताचीच. घरात केवळ आईच कमावती. वडिलांचेही प्रेम देताना आई म्हणून तेजलला सांभाळताना आणि तिचे शिक्षण करताना त्यांची मोठी कसरत सुरू आहे. अशा ‘बाप’ झालेल्या आईच्या पाठिंब्यावर व स्वत:च्या मेहनतीने तेजल नारखेडे या विद्यार्थिनीने यश संपादन केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरीगावातील कन्या विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. तेजलने अनेक छंद जोपासूनही दहावीत ९६ टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे शाळेत व परिसरात तिचे कौतुक होत आहे.
घरात कमावती व्यक्ती नसल्याने संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी तेजलची आई शोभा नारखेडे यांच्यावर आहे. मुलीला चांगले शिक्षण देण्याची प्रमुख जबाबदारी असल्याने त्यांनी तेजलला अभ्यासातही नेहमी प्रोत्साहन दिले. त्याला साथ दिली ती तेजलने. आई खासगी क्लास घेऊन मिळेल त्या पैशात संसाराचा गाडा चालवीत असल्याने घरातील कामाची जबाबदारीही तेजलवर आली. कोणताही कंटाळा न करता तेजल अभ्यास करायची.
दिवसभराच्या कामाचे आणि अभ्यासाचे तिने नियोजन केले होते. त्यामुळे अभ्यास कधी व घरातील
काम कधी हे तिचे नियोजन प्रमुख होते. त्यानुसारच तिने वर्षभर अभ्यास केला. तेजलला अभ्यासाबरोबरच गायन, चित्रकला, नृत्य अशा अनेक आवडी आहेत. ती उत्तम तबला वादकही आहे. तिने तबला वादनाचे काही खासगी कार्यक्रमही केले आहेत. त्यामुळे ती बहुगुणसंपन्न आहे.

कॉम्प्युटर इंजिनिअर होणार!

तेजल म्हणाली, ‘‘आमच्या घरात कमवता कोणीच नसल्याने त्याची जबाबदारी माझी आई पार पाडत आहे. तिला किती यातना सहन कराव्या लागत आहेत ते मी अनुभवत आहे. मी भरपूर शिकावे हे माझ्या आईचे स्वप्न आहे. त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअर होऊन आईला चांगले दिवस दाखविण्याचे मी मनाशी ठरविले आहे. म्हणून तर मी रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळविले आहे. अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. त्यातही मी यशस्वी होणार यात शंका नाही.’’

शोभा नारखेडे म्हणाल्या, ‘‘शिक्षणामुळे अनेक संकटांचा सामना करण्याची माझ्यात हिंमत आहे. तशीच हिंमत माझ्या मुलीत यावी यासाठी तिला भरपूर शिकविणार आहे. मुलगा काय अन् मुलगी काय त्यांच्यात भेदभाव करण्यापेक्षा दोघांना संस्कार काय देतो हे महत्त्वाचे आहे.’’

Web Title: She reached Sucesse due to her mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.