लोणावळा : स्थानिकांच्या सहभागातून शिवराज्याभिषेक सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:13 AM2018-12-25T01:13:42+5:302018-12-25T01:14:40+5:30

रणरागिणी ग्रुप लोणावळा व लोणावळा विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने लोणावळा व मावळवासीयांकरिता आयोजित भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Lonavla: Shivrajyabhishek ceremony from the local community | लोणावळा : स्थानिकांच्या सहभागातून शिवराज्याभिषेक सोहळा

लोणावळा : स्थानिकांच्या सहभागातून शिवराज्याभिषेक सोहळा

googlenewsNext

लोणावळा  - रणरागिणी ग्रुप लोणावळा व लोणावळा विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने लोणावळा व मावळवासीयांकरिता आयोजित भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. लोणावळा शहर व परिसरातील एक हजार स्थानिक कलाकारांनी या महानाट्यात सहभाग घेतला होता. तर अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेली छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका डोळ्यांत साठवण्याजोगी होती.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे, रणरागिणी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा मंजुश्री वाघ, लोणावळा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुकेश परमार, कार्याध्यक्ष बाळासाहेब कडू, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील इंगूळकर, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा पुष्पा भोकसे, मुख्याधिकारी सचिन पवार,
पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते या महानाट्याचे दीपप्रज्वलन करण्यात आले.
छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्र गुलामगिरीच्या साखळदंडांनी वेढला होता. रयतेला याच गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जिजाऊंच्या पोटी शिवसूर्याचा जन्म झाला आणि शिवरायांनी मुघल सलतनत विरुद्ध बंड करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. ६ जून १६७४ साली शिवतीर्थ रायगडावर रयतेचा राजा सिंहासनाधीश्वर झाला. ३२ मण सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. तो सुवर्ण क्षण आणि छत्रपती शिवरायांचा संपूर्ण जीवनपट प्रत्यक्ष रायगडाच्या प्रतिकृतीसह या महानाट्याद्वारे सादर करण्यात आला.
लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र प्रस्तुत व शिवदुर्ग मित्रचे प्रवीण देशमुख लिखित निर्मित व दिग्दर्शित या महानाट्याचे रणरागिणी ग्रुपच्या संस्थापिका मंजुश्री वाघ, लोणावळा विकास प्रतिष्ठानचे मुकेश परमार व बाळासाहेब कडू यांनी मावळ व लोणावळावासीयांकरिता मोफत आयोजन केले होते. लोणावळा शहर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच वाहतूक कोंडी रोखण्याकरिता नियोजन केले होते.

स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे : वाघ

शिवराज्याभिषेक सोहळा या महानाट्याची निर्मिती लोणावळा शहरातील युवकांनी केली असून, त्यामध्ये काम करणारे कलाकार हे देखील स्थानिक आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव देत या महानाट्याचा पहिला प्रयोग आपल्याच शहरात सादर करण्याकरिता व स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्याकरिता या महानाट्याचे आयोजन केले असल्याचे आयोजक व रणरागिणी ग्रुपच्या संस्थापिका मंजुश्री वाघ यांनी सांगितले.

महानाट्यात सहभागी असलेले आपल्याच गावातील एक हजार
कलाकार, शंभर फुटाचा भव्य रंगमंच, घोडे, उंट, बैलगाड्या,
जिवंत तोफा, आक्रमक लढाया, नगारखाना, मेघडंबरी हे सर्व पाहण्याकरिता व छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा
हा क्षण याची देही याची डोळा पाहण्याकरिता नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. लोणावळा शहर पोलिसांनी महानाट्याच्या ठिकाणी तसेच शहरात चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था राखत कोंडी रोखण्याकरिता नियोजन केले होते.

Web Title: Lonavla: Shivrajyabhishek ceremony from the local community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.