जागतिक अपंग दिन : अंध चित्रकाराची डोळस दृष्टी, पिंपळाच्या पानावर साकारल्या दिग्गज व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:34 AM2021-12-03T09:34:11+5:302021-12-03T10:03:58+5:30

महेशनं चित्रकलेची आवड लहानपणापासूनच जोपसली असून पेन्सिल चित्रानंतर पिंपळाच्या पानावरील चित्र आणि आता वेगवेगळ्या पानावरील व्यक्ती चित्रांच्या रेखाटनातून स्वत:ची ओळख निर्माण केलीय.

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, लॉकडाऊन असल्याने सर्वकाही ठप्प झाले होते. मात्र, जिथं एक संपतं तिथं दुसरी सुरूवात होते असं म्हणतात ते एका दिव्यांग अलविलयाने खरं करुन दाखवलंय.

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील जामगावच्या चित्रकार महेश मस्केनेही असाच काही करिश्मा चित्रकारितेच्या क्षेत्रात केला. लॉकडाऊनमुळे चित्रकलेसाठीचे कागद आणि पेन्सिल रंग मिळणे बंद झाल्याने नवा प्रयोग केला.

महेशनं चित्रकलेची आवड लहानपणापासूनच जोपसली असून पेन्सिल चित्रानंतर पिंपळाच्या पानावरील चित्र आणि आता वेगवेगळ्या पानावरील व्यक्ती चित्रांच्या रेखाटनातून स्वत:ची ओळख निर्माण केलीय.

गावापासून ते तालुक्यातपर्यंत तसेच राज्यभरातील दिग्गज व्यक्तींची, राजकीय नेत्यांची आणि कलाकारांची चित्रे महेशन लॉकडाऊन काळात रेखाटली.

विशेष म्हणजे महेशने केवळ ही चित्रे रेखाटली नसून ती चित्रे प्रत्यक्षपणे भेटून त्या व्यक्तींना भेटही दिली आहे. त्यामध्ये, बॉलिूवड अभिनेता आणि लॉकडाऊनचा मसीहा सोनू सूदचाही समावेश आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही बारामती येथे भेटून आपली कलाकृती भेट दिली. तर, राजभवन जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून या कलेचा मान सन्मान स्वीकारला.

मध्यंतरीच्या काळात स्वतः, मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक करून महेशला शुभेच्छा दिल्या आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फोन करुन महेशच्या कलाकृतीचे कौतुक केले.

महेशने आजतागायत पिंपळाच्या पानावर दोनशे ते तीनशेपर्यंत अनेक व्यक्तीचित्र आणि कलाकृती साकारल्या आहेत. त्यापूर्वी महेशन पेन्सिलने कागदावर हुबेहुब अशी व्यक्तीचित्र साकारली आहेत.

महेश मस्के हा चित्रकार एका डोळ्याने अंध आहे, मात्र महेशचा हा डोसळपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.