"भारतात पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही कारण...", स्टार टेनिसपटूच्या विधानानं वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 05:15 PM2024-02-10T17:15:14+5:302024-02-10T17:25:07+5:30

Serbian Tennis Star Criticises Indian Food: सर्बियन टेनिसपटू डेजाना आयटीएफ स्पर्धेसाठी दोन आठवडे भारत दौऱ्यावर होती.

सर्बियाची टेनिस स्टार डेजाना राडानोविक तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. सर्बियन टेनिसपटू डेजाना आयटीएफ स्पर्धेसाठी दोन आठवडे भारत दौऱ्यावर होती. भारतातील अनुभव सांगताना तिने वादग्रस्त विधान करून चाहत्यांच्या टीकेला आमंत्रण दिले.

भारतात आपल्याला अत्यंत वाईट अनुभव आला असल्याचे तिने सांगितले. भारताविषयी भाष्य केल्याबद्दल या टेनिस खेळाडूवर वर्णद्वेषी असल्याचा आरोप करण्यात आला होता.

खरं तर डेजानाने इंस्टाग्रामवर काही वादग्रस्त स्टोरी ठेवल्या होत्या. या माध्यमातून तिने म्हटले, "भारतातील अन्न, रहदारी आणि स्वच्छता खूप खराब आहे." तसेच तिने भारतातील एका विमानतळाचा फोटो शेअर करत 'आपण पुन्हा कधीच भेटणार नाही', असे म्हटले.

आणखी एका स्टोरीमध्ये तिने सांगितले की, ज्यांनी ३ आठवडे भारतासारख्या ठिकाणी घालवले आहेत, तीच लोक ही भावना समजू शकतात. एकूणच पुन्हा कधी भारतात पाऊल ठेवणार नसल्याचे तिने स्पष्ट केले.

दरम्यान, डेजाना राडानोविक ही सर्बियन टेनिसपटू आहे. ती बंगळुरू, पुणे, इंदूर आणि मुंबई सारख्या विविध भारतीय शहरांमध्ये आयोजित ITF स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आली होती.

सर्बियन स्टारला एका सामन्यात भारतीय खेळाडू वैदेही चौधरीकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताविषयी राडानोविकच्या टिप्पण्यांमुळे सोशल मीडियायवर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

ट्रोल झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना डेजाना राडानोविकने सांगितले की, तिच्या टिप्पण्या भारतातील लोकांबद्दल नसून देशाबद्दल होत्या. भारतातील लोक मला खूप आवडतात आणि मी त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवला आहे.

इंस्टाग्रामवरील दुसऱ्या स्टोरीमध्ये ती म्हणाली की, मला भारत देश चांगला वाटला नाही. या देशातील रहदारी, खाद्यपदार्थाचा दर्जा आणि स्वच्छतेबद्दल तक्रार करावी अशी परिस्थिती आहे.

"मला भारतातील अन्न, रहदारी आणि स्वच्छता अजिबात आवडली नाही. हॉटेलमधील खाद्यपदार्थ, पिवळ्या उशा आणि घाणेरडे बेड... इथे कसे राहायचे? असे मला वाटायचे"

वर्णद्वेषी असल्याचा आरोप फेटाळताना तिने सांगितले की, जर भारतातील कोणी सर्बियामध्ये आले आणि येथील या गोष्टी त्यांना आवडल्या नाहीत, तर याचा अर्थ तुम्ही वर्णद्वेषी आहात का? याचा वर्णद्वेषाशी काय संबंध? माझे सर्व जाती धर्मातील आणि रंगातील लोकांवर प्रेम आहे. भारतातील लोक आणि त्याच्या कामाने मी खूप प्रभावित झाले, असेही डेजानाने नमूद केले.