Brazil Football Legend Pele Death: गरिबीतील दिवस ते फुटबॉलचा बादशाह! जाणून घ्या दिग्गज 'पेले' यांचा संघर्षमय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 12:34 PM2022-12-30T12:34:58+5:302022-12-30T12:38:50+5:30

Pele dies at 82: ब्राझीलचे महान फुटबॉलपटू दिग्गज पेले यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले.

ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासाचा चेहरा अर्थात दिग्गज पेले यांनी वयाच्या 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. साओ पाउलोच्या अल्बर्ट आइनस्टाईन हॉस्पिटलच्या माहितीनुसार, पेले यांचे गुरुवारी कोलन कॅन्सरमुळे बहु-अवयव निकामी झाले, त्यामुळे त्यांचे निधन झाले.

श्वसन संक्रमण आणि कोलन कॅन्सर रोगाशी संबंधित आजारामुळे पेले यांना मागील महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यातच रूग्णालयाकडून सांगण्यात आले होते की, कर्करोग वाढू लागल्याने पेले यांची प्रकृती ढासळू लागली आहे.

60 वर्षांहून अधिक काळ एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो म्हणजेच पेले यांनी फुटबॉलच्या विश्वावर वर्चस्व गाजवले. पेले एकूण चार विश्वचषक खेळले आणि तीन वेळा चॅम्पियन बनले.

पण पेले यांची ओळख त्यांच्या ट्रॉफी आणि उल्लेखनीय गोल-स्कोअरिंग रेकॉर्डच्या पलीकडे आहे. पेले म्हणाले होते, "माझा जन्म फुटबॉल खेळण्यासाठी झाला होता, जसे बीथोव्हेनचा जन्म संगीत लिहिण्यासाठी झाला होता आणि मायकेल एंजेलोचा जन्म पेंट करण्यासाठी झाला होता."

23 ऑक्टोबर 1940 रोजी मिनास गेराइस, ब्राझील येथे जन्मलेल्या पेले यांनी गरिबीचे दिवसही पाहिले. पेले यांनी चहाच्या दुकानात वेटर म्हणून देखील काम केले.

पेले यांचे टोपणनाव डेको असे होते, परंतु स्थानिक फुटबॉल क्लबचा गोलरक्षक बिले याच्यामुळे त्यांचे नाव पेले असे पडले. लहानपणी डिको म्हणजेच पेले यांना अनेक सामन्यांमध्ये गोलरक्षकाची भूमिका बजावावी लागली होती.

जेव्हा ते शानदार बचाव करत असे तेव्हा चाहते म्हणायचे की हा दुसरा बिले (स्थानिक गोलरक्षक) आहे. हे बिले काही वेळात पेलेत कधी रूपांतरित झाले ते कोणालाच कळले नाही.

पेले यांच्या फुटबॉलपटू वडिलांनी त्यांना सगळे काही शिकवले जे एका खेळाडूला अवगत असणे गरजेचे होते. पेले यांनी 2015 मध्ये एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, "माझे वडील चांगले फुटबॉलपटू होते, त्यांनी खूप गोल केले. डोंडिन्हो असे त्यांचे नाव होते. मला त्यांच्यासारखेच व्हायचे होते. ते ब्राझीलमधील मिनास गेराइसमध्ये प्रसिद्ध होते, तेच माझे आदर्श होते. मला नेहमी त्यांच्यासारखे व्हायचे होते, पण आज मी बनू शकलो की नाही हे फक्त देवच सांगू शकतो."

बालपणात पेले यांनी वयाच्या 15 व्या वर्षी एफसी सँटोससोबत प्रशिक्षण सुरू करण्यासाठी घर सोडले. नंतर त्यांनी त्यांच्या 16 व्या वाढदिवसापूर्वी क्लबसाठी पहिला गोल केला.

खरं तर पेले यांनी सँटोस एफसी क्लबसाठी गोल करण्याची मालिकाच सुरू केली होती. मात्र, हा फॉरवर्ड खेळाडू ब्राझीलच्या आयकॉनिक यल्लो जर्सीमधील नेत्रदीपक कामगिरीसाठी जगाच्या लक्षात राहिला.

जगाला 1958 मध्ये पहिल्यांदाच दिग्गज पेले यांची झलक पाहायला मिळाली. लक्षणीय बाब म्हणजे त्यांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी विश्वचषकात पदार्पण केले होते. त्यांनी वेल्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील विजयात ब्राझीलचा एकमेव गोल केला. नंतर फ्रान्सविरूद्ध उपांत्य फेरीत हॅटट्रिक आणि यजमान स्वीडनविरूद्ध अंतिम सामन्यात 2 गोल केले.

स्वीडनच्या सिगवर्ड पारलिंगने म्हटले होते, "मी प्रामाणिकपणे सांगतो की, जेव्हा पेले यांनी फायनलमध्ये पाचवा गोल केला तेव्हा मला टाळ्या वाजवाव्यात असे वाटले." नंतर पेले यांनी ब्राझीलच्या संघासोबत 1962 आणि 1970 चा विश्वचषक देखील जिंकला.

5 फुट 8 इंच उंची असलेल्या पेले यांच्याकडे शानदार क्रीडा कौशल्य होते. त्यांच्यामध्ये 11 सेकंदात 100 मीटर धावण्याची क्षमता होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले.

पेले यांनी ब्राझीलच्या संघासाठी 92 सामन्यांत 77 गोल केले. 19 नोव्हेंबर 1969 रोजी पेले यांनी आपला 1000 वा गोल केला तेव्हा हजारो लोक पेले यांना भेटण्यासाठी मैदानावर पोहोचले होते.