Mulayam Singh Yadav Death: मुलायम सिंहांनी कारसेवकांवर गोळ्या का चालविल्या होत्या? राजकारणातील चाणक्य होते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:20 AM2022-10-11T10:20:35+5:302022-10-11T10:26:19+5:30

युवावस्थेमध्ये पैलवानीचा छंद असलेले मुलायम सिंह आखाड्यापेक्षा राजकीय डावपेचांमध्ये जास्त तरबेज होते. त्याचमुळे वेळोवेळी त्यांनी चंद्रशेखर व व्ही. पी. सिंह यांच्यासारख्या आपल्यापेक्षा ज्येष्ठ समाजवाद्यांपासून ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंत अनेकांशी दोन हात केले.

एके काळी इटावाच्या एका गावात प्राथमिक शिक्षक राहिलेले मुलायम सिंह यादव यांचा देशातील सर्वांत मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री ते देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंतचा प्रवास आधुनिक इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. युवावस्थेमध्ये पैलवानीचा छंद असलेले मुलायम सिंह आखाड्यापेक्षा राजकीय डावपेचांमध्ये जास्त तरबेज होते. त्याचमुळे वेळोवेळी त्यांनी चंद्रशेखर व व्ही. पी. सिंह यांच्यासारख्या आपल्यापेक्षा ज्येष्ठ समाजवाद्यांपासून ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंत अनेकांशी दोन हात केले.

विश्व हिंदू परिषदेच्या बाबरी मशीद जमीनदोस्त करण्याच्या घोषणेच्या उत्तरात ऑक्टोबर १९९०मध्ये मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी अयोध्येत - परिंदा भी पर नही मार पाएगा - असे वक्तव्य केल्यावर त्यांना मौलाना मुलायम म्हटले गेले. २० ऑक्टोबर व २ नोव्हेंबर रोजी अयोध्येत कारसेवकांवर गोळ्या चालवून त्यांनी स्वत:ची अल्पसंख्यकांमधील प्रतिमा अधिक मजबूत केली. परंतु त्यांचाच पक्ष जनता दलाचे नेते असूनही तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मुलायम यांना कधीच विश्वासू मानले नाही.

मुलायम यांच्या जीवनातील सर्वांत मोठा डाव १९८२मध्ये आपली समाजवादी पार्टी बनवून १९९३च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पार्टीबरोबर केलेली निवडणूक आघाडी हा होता. त्याचमुळे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही या जागेवरून निवडणूक लढवली नाही.

पुढील दीड वर्षात त्यांनी दोन्ही डाव्या पक्षांबरोबर जनता दलाच्या आमदारांना फोडून आपल्या पक्षाचा विस्तार केला. परंतु यामुळे बसपाने त्यांचा पाठिंबा काढला व त्यांचे सरकार गडगडले. मुलायम यांनी बसपाचे १२ आमदार जबरदस्तीने उचलून नेले. व्होरा यांनी त्यांचे सरकार बरखास्त केले.

घराणेशाही : मुलायम यांनी पुत्र अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री केले. भाऊ शिवपाल यांना मंत्री, चुलत भाऊ रामगोपाल यांना राज्यसभेत संसदीय पक्षाचा नेता केले. एकदा तर त्यांच्या कुटुंबातील २३ सदस्य ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व विधानसभेपासून संसदेपर्यंत कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिले होते.

कुशल प्रशासक : मुलायम सिंह यांची प्रतिमा कुशल प्रशासक म्हणून होती. त्यांचे आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कार्यकर्त्यांसाठी त्यांची दारे नेहमी खुली असत. याचमुळे राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती अधिकाऱ्यांपेक्षा त्यांना आधी असे.

देशाचे महत्त्वाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने मी अतिशय दु:खी झालो. ‘लोकमत’विषयी त्यांना आस्था, प्रेम होते. त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देऊन ‘लोकमत’ने त्यांचा गौरव केला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत दौऱ्यावेळी झालेल्या समारंभात मुलायमसिंह व मी सोबत होतो. त्याप्रसंगी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या प्रगतीविषयी मुलायमसिंह व मी सविस्तर चर्चा केली होती. राष्ट्रउभारणीसाठी मुलायमसिंह यादव यांनी दिलेले योगदान नित्यस्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दांत लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी शोक व्यक्त केला.

ते मनमोकळ्या स्वभावाचे होते. डाव्या पक्षाकडे त्यांचा नेहमी कल असायचा. याचमुळे हरकिशन सिंह सुरजित व ज्योती बसूंना ते आवडत होते. मुलायम यांचे जुने सहकारी बेनीप्रसाद वर्मा एकदा त्यांच्यावर नाराज झाले होते. तेव्हा मुलायम सिंह यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढत बरोबर घेतले.