Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati: ९व्या वर्षी घर सोडले, १९व्या वर्षी संन्यास! स्वातंत्र्यसाठी कारावास; पाहा, शंकराचार्यांचे जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 08:07 PM2022-09-11T20:07:10+5:302022-09-11T20:12:16+5:30

Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेऊन प्रसंगी तुरुंवास भोगलेल्या शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी हिंदू धर्मासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगितले जाते.

हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन झाले आहे. शंकराचार्य यांनी वयाच्या ९९व्या वर्षी नरसिंगपूर येथे अखेरचा श्वास घेतला. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती द्वारका आणि ज्योतिर्मठ या दोन मठांचे शंकराचार्य होते. मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात त्यांचा जन्म झाला होता.

मध्य प्रदेशात नरसिंहपूर येथे झोतेश्वरमध्ये परमहंसी गंगा आश्रमात हृदयविकाराचा झटका आल्यामुळे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरुपानंद सरस्वती यांना हिंदुंचे सर्वांत मोठे धर्मगुरु मानण्यात येत होते. शंकराचार्य गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर बंगरुळुत उपचार सुरु होते. अलीकडेच मध्य प्रदेशातील आश्रमात ते परतले होते.

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा जन्म मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय असे ठेवले होते. वयाच्या ९व्या वर्षी त्यांनी घर सोडून धर्मयात्रा सुरु केली होती. याच काळात ते काशीला पोहचले आमि तिथे ब्रह्मलीन स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून त्यांनी वेदांचे आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले होते.

हा तो काळ होता जेव्हा देश इंग्रजांविरुद्ध लढत होता. जेव्हा १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. वयाच्या १९ व्या वर्षीच ते क्रांतिकारी साधू म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांना वाराणसीत ९ महिने तर मध्य प्रदेशात ६ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.

यानंतर स्वामी स्वरुपानंद सन्यासी झाले होते. ज्योतिर्मठ पीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांनी त्यांना दण्ड संन्यासाची दीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती या नावाने ओळखण्यात येऊ लागले. त्यांना १९८१ साली शंकाराचार्य ही उपाधी मिळाली.

स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी राम जन्मभूमी न्यासाच्या नावे विहिप आणि भाजपला घेरले होते. अयोध्येत मंदिराच्या नावावर विहीप आणि भाजप अयोध्येत त्यांचे कार्यालय तयार करीत आहेत, ते मंजूर नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

हिंदूंमध्ये शंकराचार्य हे सर्वांत मोठे धर्मगुरु मानले जातात. हिंदूंचे सर्वोच्च न्यायालय आपण आहोत, असे ते म्हणाले होते. मंदिराचे रुप धार्मिक असायला हवे त्याला राजकीय रुप देणे अमान्य असल्याचे मत त्यांनी मांडले होते.

शंकराचार्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. या दु:खाच्या काळात त्यांच्या अनुयायांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. याशिवाय, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा ९९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या होत्या. धर्मप्रसाराबरोबरच राजकारणील अनेत बड्या नेत्यांशी त्यांचे सबंध होते. मात्र, अखेर हृदयविकाराच्या झटक्याने जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची प्राणज्योत मालवली.