Petrol Price Hike: कुणी कपाळावर हात मारला, तर कुणी पेट्रोल पंपावरच नरेंद्र मोदींच्या फोटोला दंडवत घातला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:56 PM2021-07-19T12:56:27+5:302021-07-19T13:03:57+5:30

Petrol Price Hike: जुलै महिन्यात आजपर्यंत पेट्रोलच्या दरात 9 वेळा, तर डिझेच्या दरात 5 वेळा वाढ झाली आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलनं शंभरी केव्हाच गाठली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरीपार पोहोचल्या आहेत. तसेच मुंबई आणि हैदराबादमध्ये पेट्रोल यापूर्वीच शभरीपार पोहोचलं आहे.

इंडियन ऑईल कॉरपोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आजही दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.84 रुपये, तर डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. मुंबईत आज पेट्रोल किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 102.08 रुपये, तर डिझेलचे दर 93.02 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल शंभरीपार पोहोचलं आहे. इथे पेट्रोलची किंमत 102.49 रुपये लिटर, तर डिझेल 94.39 रुपये लिटर आहे.

पेट्रोलच्या दरांत 4 मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.

उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरनं महाग झालं आहे. डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

विशेष म्हणजे जुलै महिन्यात आजपर्यंत पेट्रोलच्या दरात 9 वेळा, तर डिझेच्या दरात 5 वेळा वाढ झाली आहे. सतत होणाऱ्या इंधन दरवाढीवरुन नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही नागरिकांनी इंधनाची किंमत पाहून कपाळावर हात मारल्याचे फोटोही समोर येत आहे.

तर, विविध पेट्रोल पंपावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरवरील फोटोला पाहून दंडवत घातल्याचे फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

दरम्यान, येणाऱ्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होण्याची शक्यता आहे. कारण ओपेक प्लस (OPEC plus) देशांनी ऑगस्ट महिन्यापासून तेलाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी ओपेक प्लस देशांच्या मंत्र्यांनी ऑगस्ट महिन्यापासून तेल पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना संकटानंतर आता जागतिक अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा होताना दिसत आहे. यामुळे तेलाची मागणीही वाढली आहे. मात्र, उत्पादनाची मर्यादा असल्याने सद्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत अडीच वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च स्थरावर जाऊन पोहोचली आहे.

या आठवड्यात कच्च्या तेलाचा क्लोजिंग दर 73.14 डॉलर प्रति बॅरल होता. तर जुलै महिन्यात हा दर 78 डॉलरपर्यंत पोहोचला होता. गेल्या तीन महिन्यात सातत्याने झालेल्या वाढीनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत या महिन्यात साधारणपणे 2 टक्क्यांनी घसरण बघायला मिळाली आहे.