मिसाईल मॅन कालवश

By admin | Published: July 28, 2015 12:00 AM2015-07-28T00:00:00+5:302015-07-28T00:00:00+5:30

डॉ.कलाम हे थोर शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मुत्सदी होते. लाखो युवकांना प्रेरणा देणारे खरे देशभक्त होते. उक्ती आणि कृतीतून त्यांनी युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना म्हटले. त्यांनी आपल्या व्यवस्थेत दिलेले योगदान असमांतर असेच राहील. त्यांनी देश- विदेशातील लाखो लोकांना प्रेरित केले. आयआयएममध्ये अखेरचे भाषण देतानाही त्यांनी युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले असेही त्या म्हणाल्या.

डॉ. कलाम हे जनतेच्या मनात घर करणारे राष्ट्रपती होते. त्यांच्या स्वभावातील नम्रता सदाचार यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत. लहान मुलांवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी ते देशातील युवकांना कायम प्रोत्साहन देत. त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या महान कार्यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोलाची भर पडली आहे. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे असे सांगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी कलाम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

डॉ. कलाम हे जीवन आणि कार्यामुळे देशवासीयांना प्रेरित करणारे महापुरुष होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कानी पडताच माझ्याकडे शब्दच नव्हते. ते एखाद्या महापुरुषाप्रमाणे जीवन जगले. आपल्या कार्याने त्यांनी देशवासीयांना कायम प्रेरित केले. आज संपूर्ण देश त्यांना नमन करीत आहे. त्यांनी वैज्ञानिकाच्या रूपात देशाला नव्या उंचीवर नेले या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

डॉ. अब्दुल कलाम यांना भारतरत्नसह अन्य अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाला नवे पंख मिळवून देणारे कलाम यांचे देशाच्या उपग्रह कार्यक्रम गायडेड आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्प अण्वस्त्र कार्यक्रम आणि हलक्या लढाऊ विमान प्रकल्पातही त्यांनी योगदान दिले.

सच्चा मुस्लीम आणि एका नावाड्याचा मुलगा अवुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे १८ जुलै २००२ रोजी भारताच्या ११ व्या राष्ट्रपतिपदी आरूढ झाले. देशाच्या जनतेकडून सर्वाधिक आदर प्राप्त करणारे भारताचे राष्ट्रपती असलेले कलाम यांनी एक शास्त्रज्ञ म्हणूनही मोठे योगदान दिलेले आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी अतिशय सामान्य परिस्थितीत आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि लोकांचा राष्ट्रपती म्हणून सन्मान प्राप्त केला. त्यांनी समाजाच्या सर्वच घटकाच्या मुख्यत्वे युवकांच्या हृदयात स्थान मिळविले.

तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे १५ ऑॅक्टोबर १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला होता. मद्रास तंत्रज्ञान संस्थेत भौतिकशास्त्र आणि एअरोस्पेस विषयात पदवी घेतल्यानंतर ते संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत (डीआरडीओ) रुजू झाले. तेथे त्यांनी संरक्षण आणि अंतराळ या क्षेत्रातच लक्ष दिले व नंतर ते भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात सामील झाले.

शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना अचानक घेरी येऊन कोसळले. त्यांना लगेच नानग्रिम हिल्स येथील बेथनी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. कलाम यांच्या निधनाबद्दल शासनातर्फे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

देशातील तरुण पिढीच्या स्वप्नांना आपल्या अग्निपंखांचे बळ देणारे भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी रात्री मेघालयमधील शिलाँग येथे हृदयाघाताने निधन झाले. कलाम यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली असून देशाच्या वैज्ञानिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली असल्याची शोकसंवेदना व्यक्त होत आहे.