Mamta Banerjee Birthday : साधी राहणी, आक्रमक राजकारणी! अशी आहे बंगालच्या रणरागिणीची धडाकेबाज कारकीर्द

By बाळकृष्ण परब | Published: January 5, 2021 12:13 PM2021-01-05T12:13:36+5:302021-01-05T12:25:36+5:30

Mamta Banerjee Update :

बंगालमधील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असल्याने सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव सध्या चर्चेत आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात सतत आक्रमक भूमिका घेत असल्याने भाजपाचे नेते आणि ममता बॅनर्जींमध्ये राजकीय जुगलबंदी रंगत असते. ममता बॅनर्जी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त घेतलेला त्यांच्या कारकीर्दीचा आढावा.

ममता बॅनर्जींचा जन्म ५ जानेवारी १९५५ रोजी तेव्हाच्या कलकत्त्यामध्ये झाला होता. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. ममता बॅनर्जी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी ममता बॅनर्जींवर आली होती.

गरिबीशी संघर्ष करताना ममता बॅनर्जी यांनी छोटीमोठी कामे करून आपल्या लहान भावंडांचे पालनपोषण केले. लहानपणापासूनच मेहनती आणि प्रामाणिक चेहऱ्यासह राजकारणात प्रवेश करण्याची त्यांची इच्छा होती.

कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर ममता बॅनर्जींच्या राजकीय वाटचालीची सुरुवात १९७० पासून झाली होती. १९७६ ते १९८० पर्यंत त्या महिला काँग्रेसच्या महासचिव होत्या. १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सीपीएमचे मातब्बर नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव केला होता. त्यावेळी देशातील सर्वात युवा खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

ममता बॅनर्जींची साधी राहणी हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्या नेहमी पारंपरिक बंगाली सुती साडी परिधान करतात. तसेच कुठलेही दागदागिने वापरत नाहीत. घरामध्येही त्या साधेपणाने राहतात. त्या जन्मभर अविवाहित राहिल्या. त्यांच्या खांद्यावर नेहमी एक सुती झोळी असते. ती त्यांची ओळख बनली आहे.

काँग्रेसमध्ये मतभेद झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर एनडीए सरकारमध्ये त्या रेल्वे मंत्री बनल्या होत्या. देशाच्या पहिल्या महिला रेल्वेमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. पुढे काँग्रेससोबत आघाडी झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पुन्हा रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारमध्ये कोळसा, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, महिला बालविकास राज्यमंत्री अशी खाती सांभाळली होती. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या सत्तेला आव्हान दिल्यानंतर ममता बॅनर्जींना खरी ओळख प्राप्त झाली. २०११ मध्ये माँ, माटी आणि मानूश या या त्रिसुत्रीच्या आधारावर ममता बॅनर्जींनी राज्यातील ३४ वर्षांपासूनची डाव्यांची सत्ता उखडून टाकली होती. त्यानंतर २०१२ मध्या टाइम मासिकाने त्यांचा जगातील १०० प्रभावशाली लोकांमध्ये समावेश केला होता.

ममता बॅनर्जी या राजकारण्यासोबत उत्तम चित्रकारही आहेत. फावल्या वेळी त्या घरामध्ये चित्रे काढणे पसंत करतात. तसेच त्यांना संगीत ऐकणे आवडते.